‘पेस्ट कंट्रोल’ मुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू Print

प्रतिनिधी
‘पेस्ट कंट्रोल’ केलेल्या फ्लॅटमध्ये कीटकनाशकांच्या परिणामामुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. नारायण पेठेमध्ये मंगळवारी ही घटना घडली.
आकाश राजकुमार मेहेत्रे (वय १८, मूळ रा. लातूर) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. आकाश हा पुण्यातील एका खासगी विधी महाविद्यालयात पहिल्या वर्षांला शिकत होता. नारायण पेठेतील एका इमारतीत आकाश व अन्य चार मित्रांनी एक फ्लॅट भाडय़ाने घेतला होता. २२ सप्टेंबरला फ्लॅटमध्ये औषध फवारणी करण्यात आली. सकाळी अकराला औषध फवारणी झाल्यानंतर रात्री आठपर्यंत हा फ्लॅट बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. मात्र, संध्याकाळी आकाश हा एकटाच फ्लॅटमध्ये होता. फवारणी केलेल्या औषधांमुळे त्याला काही वेळात त्रास सुरू झाला.
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आकाशने त्याचा मित्र अतुल पाटील याला फोन केला व आपल्याला कसेतरी होत असून उलटय़ाही होत असल्याचे त्याने फोनवर सांगितले. त्यामुळे अतुल व इतर मित्र तातडीने फ्लॅटवर पोहोचले. आकाश हा अत्यवस्थ असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हालविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी आकाशला ससून रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. ससूनमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास आकाशचा मृत्यू झाला.