पिंपरीत डिसेंबर २०१३ पर्यंत ‘बीआरटीएस’ रस्ते पूर्ण करणार Print

पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील बीआरटीएस रस्त्यांची सर्व कामे डिसेंबर २०१३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून शहरातील चार बीआरटीएस रस्त्यांवर एकूण ९१ बसस्टॉप राहणार आहेत. यासाठी चार संस्थांपैकी ‘थर्ड व्हेव्ह डिजाईन’ या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी व कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी समन्वयक बापू गायकवाड उपस्थित होते. पुणे-मुंबई बीआरटीएसचे काम जवळपास पूर्ण झाले असून काही अडचणी आहेत. मात्र, त्यावर निश्चितपणे मार्ग काढण्यात येईल, असे ते म्हणाले. बीआरटी बसस्टॉपसाठी चार संस्थांच्या ११ डिजाईन पालिकेकडे आल्या होत्या. त्यापैकी ‘थर्ड व्हेह’ च्या डिजाईनला पसंती देण्यात आली व त्यांची दोन टक्के रक्कम व सेवाकर देऊन सल्लागार संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली.
शहरातील चार बीआरटी रस्त्यांवर एकूण ९१ बस स्टॉप राहणार असून त्यापैकी १६ बसस्टॉप ‘पीपीपी’ तत्त्वावर भारत विकास ग्रुप या संस्थेकडून उभारण्यात येणार आहेत. त्यांचे १२ बसस्टॉप तयार आहेत. उर्वरित ७४ बसस्टॉप नियुक्त सल्लागार संस्थेच्या मार्गदर्शनाखाली बसवण्यात येतील, असे ते म्हणाले. दरम्यान, नाशिकफाटा
उड्डाणपुलाच्या कामासाठी येथील विस्थापित करण्यात आलेल्या कुटुंबांना २८ हजार रुपये प्रत्येकी दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात
आले.