महिलांची फसवणूक करून दुचाकी चोरणारा गजाआड Print

प्रतिनिधी
महिलांची फसवणूक करून दुचाकी व वस्तू चोरणाऱ्या आरोपीला पकडण्यात स्वारगेट पोलिसांना अखेर यश आले. शहरामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून त्याने विश्रामबाग, खडक, स्वारगेट, बिबवेवाडी, सहकारनगर आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अशाप्रकारचे नऊ गुन्हे केल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.
प्रवीण ऊर्फ पिंटय़ा पांडुरंग रांगोळे (वय २९, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, पर्वती दर्शन, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रांगोळे हा एखाद्या पार्किंगमधून दुचाकी चोरून दुसरा गुन्हा करण्यासाठी शहरात फिरत असे. दुचाकीवरून एकटय़ा जाणाऱ्या महिलेला गाठून ‘तुमच्या गाडीच्या चाकाचे नट सैल झाले असून चाके हालत आहेत,’ असे सांगत होता. महिलेने गाडी थांबविल्यावर ‘मी मॅकॅनिक आहे, तुमची गाडी लगेच दुरुस्त करून देतो’, असे सांगून तो महिलेचा विश्वास संपादन करीत होता. त्यानंतर ट्रायल घेतो, असे सांगून तो पूर्वी चोरलेली दुचाकी त्या महिलेजवळ सोडून संबंधित महिलेची दुचाकी घेऊन पळून जात होता. या दुचाकीच्या डिकीत ठेवलेल्या वस्तू तो काढून घेत होता.
एका महिलेकडून चोरलेली दुचाकी घेऊन तो पुन्हा दुसरी महिला गाठून तोच प्रकार करीत होता. दिवसातून अशा प्रकारचे दोन-तीन प्रकार केल्यानंतर शेवटी चोरलेली दुचाकी पुन्हा एखाद्या पार्किंगमध्ये तो सोडून द्यायचा. दोन-तीन दिवसांनंतर पुन्हा हेच प्रकार करण्यासाठी तो बाहेर पडत होता. गेल्या तीन महिन्यांपासून शहराच्या विविध भागांत होणाऱ्या या प्रकारांमुळे पोलीसही चक्रावून गेले होते. या प्रकरणात सराईत गुन्हेगारांची माहिती घेण्याचे काम सुरू असताना पोलीस कर्मचारी योगेश जगताप यांना रांगोळे याच्याविषयी माहिती मिळाली. त्यानुसार स्वारगेट पोलिसांच्या पथकाने गिरीधर भवन चौक येथे सापळा लावून त्याला पकडले. त्याने एकूण नऊ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.    

फसवणूक झालेल्या महिलांनी संपर्क करण्याचे आवाहन
महिलांना फसवून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीच्या आतापर्यंतच्या तपासात नऊ गुन्हे उघड झाले आहेत. त्याच्याकडे अजूनही तपास सुरू असून, अशाप्रकारे फसवणूक झालेल्या महिलांनी स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पठारे यांनी केले आहे. संपर्क क्रमांक  ०२०-२६२०८३१९ किंवा ९९२३१०७६९२.