संक्षिप्त Print

‘आई’ काव्यखंडाचे प्रकाशन
‘विश्वमाता फाउंडेशन’ ने प्रकाशित केलेल्या ‘आई’ या काव्यखंडाचे ३० ऑक्टोबरला प्रकाशन होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या काव्यखंडात वि.दा. सावरकर, ग.दि. माडगूळकर आदींपासून प्रवीण दवणे, विजया वाड आणि अगदी सामान्य सुरक्षारक्षकापर्यंतच्या कवींच्या एकूण ११११ कवितांचा समावेश आहे. या वेळी संजय जगताप लिखित आणि  पृथ्वीराज प्रकाशन प्रकाशित ‘आई मला जगायचंय’  या पुस्तकाचेही प्रकाशन होणार आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकरिया कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. तर, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अभिनेत्री व गायिका फैयाज यांना ‘माणूस पुरस्कार’
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा ‘माणूस पुरस्कार’ या वेळी ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री फैयाज यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ३० ऑक्टोबर रोजी एस. एम.जोशी सभागृह येथे पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नागपूरचा ‘सिंफोनेरा’ बँड विजयी
नागपूरच्या ‘सिंफोनेरा’ बँडने आंतरमहाविद्यालयीन टाटा डोकोमो रॉकबँड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. महाराष्ट्रातील १६० बँड्सनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विजेत्या बँडला ७५ हजार रुपयाचे रोख पारितोषिक आणि एक होंडा बाईक बक्षीस मिळाली. तसेच, भारतातील प्रसिद्ध बँड ‘स्वरात्मा’बरोबर कार्यक्रम करण्याची संधीही विजेत्या बँडला मिळणार आहे. नाशिकचा ‘डायबॉलिक लॉर्ड्स’ या बँडने २५ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळविले. या प्रसंगी टाटा डोकोमो महाराष्ट्र व गोवा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपम वर्मा उपस्थित होते.
आर्थिक मदतीचे आवाहन
सोनम प्रभाळे (वय १८) ही ‘क्रोनिक किडनी डिसीज’ ने त्रस्त आहे. तिच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे ५ लाख ७० हजार इतका खर्च येणार आहे. तिचे कुटुंब हा खर्च करण्यास असमर्थ असून इच्छुकांनी आपली मदत डॉ. डी.वाय. पाटील रिसर्च सेंटर, आंध्रा बँक, पिंपरी, खाते क्रमांक १११७१००११०००५४० या क्रमांकावर पाठवावी. अधिक माहितीसाठी संपर्क- ०८१८००१८००७, ०२०- ३२३९३३४२.
‘रोटरी गणित ऑलिम्पियाड’चे पारितोषिक वितरण
रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड तर्फे घेण्यात आलेल्या ‘रोटरी गणित ऑलिम्पियाड’ स्पर्धेची अंतिम फेरी व परितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. ही स्पर्धा ७ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आली होती. या वेळी गट अ (७वी व ८वी) मध्ये घेतलेल्या स्पर्धेत सिंहगड स्पिं्रगडेल विद्यालयातील मृण्मयी अवचट व कुणाल देशमुख यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर मुक्तांगण विद्यालयाच्या अमेय मेढेकर, परमेश महाजन व ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या साहिल दीक्षित, मयूरेश भट्टू यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. तसेच दुसऱ्या गटात (९वी व १०वी) मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत सेंट व्हिनसेंट विद्यालयाच्या शिवम नादिमपल्ली व सिद्धार्थ धर्मा यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर, अभिनव इंग्लिश मिडीयम विद्यालयातील आनंद नाईक, अक्षय तिवारी यांनी द्वितीय, बालशिक्षण पुणेच्या अनिश कुलकर्णी, इशान बागुल यांनी तृतीय क्रमांक पटाकवला. संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या हस्ते या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
स्वस्त दरात दिवाळी मिठाई योजना
राष्ट्रवादी मजदुर काँग्रेस तर्फे दिवाळी निमित्त गरीब व गरजू नागरिकांसाठी स्वस्त दरात दिवाळी मिठाई योजना राबवण्यात येणार आहे. या मिठाईची किंमत ८० ते १०० रुपये प्रतिकिलो असल्याने वाढत्या महागाईच्या काळात गरजू नागरिकांना दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेता यावा या हेतूने बाजारभावापेक्षा स्वस्त व रास्त किमतीत मिठाई विकण्यात येणार आहे. पाच नोव्हेंबर पासून शहरातील मंडई, मार्केटयार्ड, गुरुवार पेठ, भवानी पेठ, विश्रामबाग वाडा तसेच पिंपरी चिंचवड भागातील डांगे चौक व नेहरुनगर अशा शहरातील नऊ केंद्रांवरुन या मिठाईची विक्री करण्यात येणार आहे.