‘पु. ना. गाडगीळ अ‍ॅन्ड सन्स’आता मुंबई आणि साताऱ्यातही Print

पुणे/प्रतिनिधी
सोने, चांदी, हिऱ्यांचे दागिने आणि मौल्यवान रत्नांच्या व्यवसायातील अग्रगण्य विश्वासार्ह पेढी म्हणून ओळख असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ अ‍ॅन्ड सन्स’चे पदार्पण आता देशाच्या आर्थिक राजधानीत होणार आहे. ‘पु. ना. गाडगीळ अ‍ॅन्ड सन्स’चे दालन मुंबईत प्रभादेवी येथे सुरू होत असून, साताऱ्यातही एक दालन लवकरच सुरू होणार असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. मुंबईतील नामवंत सराफी पेढय़ांनी यापूर्वीच पुण्यात पदार्पण केले असले तरी पुण्यातील नामवंत सराफी पेढय़ांनी मात्र मुंबईत व्यवसाय सुरू केलेला नाही. ‘पु. ना. गाडगीळ अ‍ॅन्ड सन्स’ने आता मुंबईत जाण्याचे ठरवले असून त्यांच्या मुंबईतील या दालनाचे उद्घाटन ४ नोव्हेंबर रोजी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अभय गाडगीळ यांनी दिली. मुंबईत पदार्पण करताना मुद्दामच मराठी भागाची निवड केली असली, तरी मुंबई बहुभाषी असल्यामुळे सर्वभाषी समाज ज्या पद्धतीचे दागिने वापरतो त्या प्रकारातील दागिने मुंबईत उपलब्ध असतील, असे अजित गाडगीळ यांनी सांगितले.