मानसी महिला केंद्राच्या ‘पुनवडी जत्रे’ला सुरुवात Print

प्रतिनिधी
महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचतगटांच्या चळवळीला बळ देण्याची गरज आहे. महाराष्ट्र बचतगटांचे राज्य म्हणून नावारूपाला आले पाहिजे, अशी अपेक्षा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
मानसी महिला उन्नती केंद्राच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात भरविण्यात आलेल्या पुनवडी जत्रेचे उद्घाटन मोघे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. आमदार दीप्ती चवधरी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. बचतगटांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी त्यांना छोटेमोठे बाजार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शासन ज्या पद्धतीने बचतगटांना साहाय्य करत आहे त्याच पद्धतीने सामाजिक संस्थांनीही बचतगटांच्या साहाय्यासाठी पुढे यावे, असे आवाहन या वेळी मोघे यांनी केले. मानसी महिला उन्नती केंद्रातर्फे आयोजित पुनवडी जत्रेचे यंदा दहावे वर्ष असून हा उपक्रम परदेशातही तीन वर्षे करण्यात आला होता, अशी माहिती आमदार चवधरी यांनी दिली. पुनवडी जत्रेत महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंचे तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल असून दिवाळीसाठी आवश्यक अशा अनेक वस्तू व साहित्य या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आले आहे. कलाकुसरीच्या वस्तू, महिला व लहान मुलांचे कपडे, बॅगा, पर्स, शोभेच्या वस्तू, शोभेचे दिवे, पणत्या, सौंदर्यप्रसाधने, पारंपरिक खाद्यपदार्थ यांचे स्टॉल बचतगटांनी या जत्रेत मांडले आहेत.