लक्ष्मीकांतचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यास प्राधान्य- प्रिया बेर्डे Print

पिंपरी / प्रतिनिधी
विनोदाचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांना टेनिस व बुद्धिबळ खेळायला खूप आवडायचे. अभिनयाचे क्षेत्र सांभाळतानाच हे छंदही ते जोपासत होते, अशी आठवण सांगतानाच लक्ष्मीकांत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भविष्यात टेनिस, बुद्धिबळ व एकांकिका स्पर्धाही भरवण्याचा मानस अभिनेत्री व लक्ष्मीकांतच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी िपपरीत बोलताना व्यक्त केला. लक्ष्मीकांतला सामाजिक उपक्रम राबवायचे होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यावरच भर देणार असल्याचे बेर्डे यांनी या वेळी नमूद केले.
कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाउंडेशन व मास्टर इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय गायन, वादन व नृत्यविषयक ‘स्टार बॅटल’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती फाउंडेशनच्या संचालिका व लक्ष्मीकांत यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्पर्धेची प्राथमिक चाचणी १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान पुणे व िपपरी-चिंचवडसह सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये होणार आहे. ७ ते १४, १५ ते २५, २६ ते ४० आणि ४० च्या पुढील अशा विविध वयोगटात होणाऱ्या स्पर्धेत कोणत्याही कलावंतांना भाग घेता येणार आहे. पुण्याच्या बालेवाडी येथे अंतिम स्पर्धा होणार आहे. राज्यातील लहानात लहान गावातील कलाकारांसाठी ही स्पर्धा असून त्यांना व्यासपीठ मिळवून देत त्यांची कला अजमावणे व कौतुकाची थाप देणे हा स्पर्धेचा हेतू असल्याचे या वेळी सांगण्यात
आले.
या वेळी प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांतच्या काही आठवणी सांगितल्या. ‘‘त्यांना कॅरम, टेनिस व बुध्दिबळ खेळण्याची आवड होती. सामाजिक क्षेत्रात भरीव काम करायचे होते. उमद्या कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एकांकिका स्पर्धा भरवायच्या होत्या. हे सर्व उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून राबवणार असून त्यासाठी प्राधान्यक्रम ठेवणार आहे.’’