हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीचे पोलीस आयुक्तांचे संकेत Print

दोन हजार पोलिसांना हेल्मेटचे वाटप
 प्रतिनिधी
दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे सक्तीचे असल्यामुळे प्रथम पोलिसांपासून हेल्मेट सक्तीला सुरूवात करून नागरिकांना त्याचे महत्त्व पटवून देत हळूहळू सर्वाना हेल्मेट सक्ती केली जाईल, असे सांगत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी शहरात हेल्मेट सक्तीची पुन्हा अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले.
शहरातील बजाज अलाइंज लाईफ इन्शुरन्स लि., एन. के. बजाज व महिंद्रा व्हेईकल मॅन्यु या कंपन्यांनी पोलिसांना विनामूल्य दिलेल्या हेल्मेटचे वितरण पोळ यांच्या हस्ते पोलिसांना करण्यात आले; त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सह पोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल, बजाज अलाइंजचे रितुरात भट्टाचार्य, एन.के.बजाजचे शरदचंद्र करंदीकर, महिंद्र व्हेईकलचे विजय मगर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, अपर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके, सुरेशकुमार मेखला, वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे आदी उपस्थित होते. या वेळी शहराच्या वाहतूक समस्येसंदर्भात सुजित पाथरकर यांनी तयार केलेल्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले.
पुण्यात वाहतुकीची मोठी समस्या आहे. शहरात अपघातामुळे वर्षांत पाचशेच्या आसपास मृत्यू होतात. त्यामुळे नागरिकांना हेल्मेट सक्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला नागरिकांनी मोठा विरोध केला. त्यामुळे सुरूवातीला पोलिसांपासून हेल्मेट सक्ती करत नागरिकांनाही त्याचे महत्त्व पटवून देत त्यांनाही हळहळू हेल्मेट सक्ती केली जाईल, असे पोळ म्हणाले. तेंडुलकर यांनी पोलिसांना हेल्मेट देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी केले.