सहा मेट्रो मार्गाच्या बाजूने चार एफएसआय वापराची सक्ती Print

प्रतिनिधी
पुणे शहरात प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना ५०० मीटपर्यंत निवासी बांधकामासाठी चार एफएसआय उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विकास आराखडय़ात मांडण्यात आला असून त्यापेक्षा कमी एफएसआय वापरता येणार नाही आणि जागा दोन वर्षांपेक्षा अधिक काळ बांधकामाविना रिकामी ठेवता येणार नाही, असेही बंधन घातले जाणार आहे.
शहरात शेतकी महाविद्यालयापासून निगडी, वारजे, कात्रज, वाघोली, औंध आणि हडपसर असे मेट्रोचे सहा मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यांची एकूण लांबी ७६ किलोमीटर इतकी असून त्यातील शेतकी महाविद्यालय ते स्वारगेट हा मार्ग हा भुयारी आहे. मेट्रोचा वापर वाढावा यासाठी मेट्रो मार्गाच्या परिघात लोकसंख्येची घनता अधिक प्रमाणात निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना मेट्रो प्रभावित क्षेत्रामध्ये चार एफएसआय दिला जाणार आहे. तो मेट्रो इन्फ्लूएन्स झोन असेल आणि हा झोन असल्यामुळे त्यातील एक एफएसआय मूळ असेल व वरील तीन एफएसआय १.२५ या प्रीमियम दराने घ्यावा लागेल.
मंजूर एफएसआयपेक्षा या झोनमध्ये जादा एफएसआय वापरता येणार नाही. तसेच या झोनमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ प्लॉट रिकामा ठेवता येणार नाही. तसे केल्यास शीघ्र सिद्ध गणकाच्या (रेडिरेकनर) दराने होणारी पाच टक्के एवढी रक्कम सेस म्हणून आकारण्यात येईल. त्याबरोबरच मेट्रो स्टेशन, एसटी स्थानके, रेल्वे स्टेशन, शासकीय इमारतींपासून २०० मीटर परिसरात महापालिकेस पार्किंग बांधून दिल्यास अतिरिक्त एफएसआय देण्याचीही तरतूद आराखडय़ात प्रस्तावित करण्यात आली आहे.