जलस्वावलंबनाचा संदेश देण्यासाठी जलदिंडीचे प्रस्थान! Print

आळंदी ते पंढरपूरचा ४०० किलोमीटरचा जलप्रवास
 प्रतिनिधी
या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे ‘जलदिंडी’ मोहिमेतर्फे प्रवासातील गावांना जलस्वावलंबनाविषयी प्रबोधन केले जाणार आहे. जलस्वावलंबन हा स्वभाव बनावा यासाठी नदीखोऱ्यांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे, असे मत जलदिंडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वास येवले यांनी व्यक्त केले.
सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या जलदिंडीने गुरुवारी श्रीक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी घाटापासून टाळमृदुंगाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. ही दिंडी इंद्रायणी व नद्यांच्या पात्रातून आळंदी ते पंढरपूर असा चारशे किलोमीटरहून अधिक लांबीचा प्रवास करणार आहे. हा प्रवास बारा मुक्कामांचा असेल. हे जलदिंडीचे दहावे वर्ष आहे. या वर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसाच्या पाश्र्वभूमीवर या प्रवासात गावांमध्ये जलस्वावलंबनाविषयी प्रबोधन केले जाणार आहे. या दिंडीची सुरुवात गुरुवारी आळंदी येथून झाली. या वेळी ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीची महापूजा, पालखी पूजा आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध नद्यांच्या पाण्याचे पूजन करून जलदिंडीला सुरुवात करण्यात आली. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक हभप मारुती महाराज कुऱ्हेकर, आळंदी मनपाच्या अध्यक्ष वर्षां कोद्रे, नगरसेवक डी. डी. भोसले, पिंपरी-चिंचवड महापालिका जलशुद्धीकरण केंद्राचे प्रवीण लडकत, डॉ. येवले, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.