पुणेकर नाही, तर बिल्डर हा विकास आराखडय़ाचा केंद्रबिंदू Print

सत्तेच्या मस्तीत राहू नका, मुंबईत बाबा आहेत- बापट
 प्रतिनिधी
सर्वसामान्य पुणेकर नाही, तर बिल्डर हा केंद्रबिंदू ठेवून तयार झालेल्या पुणे शहराच्या विकास आराखडय़ाची मुख्यमंत्र्यांनी प्राथमिक चौकशी करावी, अशी मागणी आमदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. बहुमताच्या मस्तीत कोणी राहू नये. मुंबईत आता बाबा आहेत. बहुमताच्या जोरावर जरी पुण्यात हा आराखडा मंजूर झाला, तरी हे कारस्थान आम्ही मुंबईत हाणून पाडू, असेही ते म्हणाले.
महापालिकेच्या मुख्य सभेला सादर झालेल्या विकास आराखडय़ासंबंधी भारतीय जनता पक्षाची भूमिका आमदार बापट यांनी शुक्रवारी स्पष्ट केली. आमदार भीमराव तापकीर आणि माधुरी मिसाळ यांचीही या वेळी उपस्थिती होती. आराखडय़ाला देण्यात आलेल्या सर्व उपसूचना आम्हाला नामंजूर असून आम्ही त्या विरोधात मतदान करू तसेच कोणतेही आरक्षण उठवायला आमचा विरोध राहील, असे बापट यांनी या वेळी सांगितले. शहराचा विकास आराखडा पाहता बिल्डर लॉबी सक्रिय असल्याचेच दिसते आहे आणि त्यांनी केलेल्या सर्व मागण्या उपसूचनांच्या माध्यमातून आराखडय़ात आल्या आहेत. पुणे शहर अशा पद्धतीने कोणी विकायला काढले असेल, तर आमचा त्याला विरोध राहील आणि म्हणूनच या आराखडय़ाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी अशी आमची मागणी आहे, असेही बापट म्हणाले.
प्रशासनाने तयार केलेल्या आराखडय़ाला ६० उपसूचना देण्यात आल्या आहेत आणि विकास नियंत्रण नियमावलीत ६० बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. हा प्रकार म्हणजे प्रशासनाच्या आराखडय़ाला दिलेले आव्हानच आहे. त्यामुळे १९८७ चा विकास आराखडा हा पाया धरून शहरात नगर नियोजन योजना (टीपी स्कीम) राबवा, अशी मागणी करून बापट म्हणाले, की या आराखडय़ातील सर्व योजना या सामान्यांचा नाही, तर बिल्डर लॉबीचा फार मोठा फायदा करून देणाऱ्या आहेत.
पैसे दिले, आरक्षण उठवले- मिसाळ
हा आराखडा म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असून आराखडा पूर्णत: रद्द होणेच आवश्यक आहे, अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी या वेळी केली. पुणे बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी केलेला हा आराखडा असून ज्यांनी पैसे दिले त्यांच्या जागांवरील आरक्षणे उठवली, ज्यांनी दिले नाहीत, त्यांच्या जागांवर ती टाकली, असे प्रकार झाल्याचेही त्यांनी सांगितले. मध्यमवर्गीयांना या आराखडय़ातून काहीही मिळाले नाही. कारण त्यांच्यात कोणी पैसे देणारे नव्हते, असेही मिसाळ म्हणाल्या.