पुणे विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांना आज सुटी Print

बकर ईदमुळे पुणे विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शनिवारी (२७ ऑक्टोबर) होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे शुक्रवारी बकर ईदची सुटी देण्यात आली होती. मात्र, शनिवारी ईद होणार असल्यामुळे पुणे विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शनिवारी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुणे विद्यापीठाचे २७ ऑक्टोबरला होणारी बी.ए.चे प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष आणि बीएस्सी तृतीय वर्षांची परीक्षा ३ नोव्हेंबरला होणार आहे. प्रथम आणि द्वितीय वर्ष बीएस्सी आणि बी.फार्मची परीक्षा ३१ ऑक्टोबरला होणार आहे. आर्किटेक्चर आणि तृतीय वर्ष बीएस्सीची गणित विषयाची परीक्षा ५ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे, तर बीबीएम आणि बीबीएची परीक्षा ३० ऑक्टोबरला होणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्याही सर्व शाखांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षांच्या सुधारित तारखा परीक्षा केंद्रांना नंतर कळवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपापल्या परीक्षा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.