पिंपरी पालिकेतील ‘उद्योगी’ अधिकारी ‘लाचलुचपत’ चौकशीच्या जाळय़ात Print

पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या काही बडय़ा व ‘उद्योगी’ अधिकाऱ्यांची गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे पालिकावर्तुळात खळबळ उडाली असून या अधिकाऱ्यांचे व त्यांच्या हितचिंतकांचे धाबे दणाणले आहे. लाचलुचपत विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी या माहितीस दुजोरा दिला. तथापि, चौकशी पूर्ण होईपर्यंत यासंदर्भातील माहिती उघड करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पालिकेच्या विद्युत, स्थापत्य, बांधकाम परवाना आदी विभागांतील हे अधिकारी चौकशीच्या जाळय़ात आहेत. याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रारी झाल्या होत्या, त्यानुसार ही चौकशी सुरू झाल्याचे सांगण्यात येते. विद्युत विभागात टक्केवारीच्या ‘पंचामृता’ मुळे वादग्रस्त ठरलेले चार अधिकारी या चौकशीच्या जाळय़ात अडकले आहेत. काही वर्षांपूर्वी याच विभागातील एका मुख्य अधिकाऱ्याच्या घरावर लाचलुचपत विभागाने छापा मारला होता. बांधकाम परवानगी विभागातील काही अधिकाऱ्यांविषयी सातत्याने तक्रारी होत आहेत. मात्र, त्यांना मोठे राजकीय आशीर्वाद आहे. भ्रष्टाचाराचे सर्वाधिक आरोप स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांवर सातत्याने होत आहेत. संशयाची सुई असलेल्या या अधिकाऱ्यांविषयी गुप्त माहिती जमा करण्यात आली आहे. अनेकांनी शहराच्या हद्दीबाहेर, मूळ गावाकडे स्थावर मालमत्ता केल्या आहेत. काहींनी सोन्यात गुंतवणूक केली तर काहींनी नातेवाइकांच्या नावे आर्थिक व्यवहार केल्याची माहिती पुढे आली आहे. त्या सर्व कागदपत्रांची कसून तपासणी होत असल्याचे समजते.
श्रीमंत असलेल्या महापालिकेचे बरेच अधिकारी व ठेकेदार यांच्यात थेट भागीदारी आहे. त्यातून पालिकेची वर्षांनुवर्षे लूट सुरू आहे. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्वत:चा फायदा करून घेत अधिकाऱ्यांच्या उधळपट्टीला मोकळे रान दिले. सुरुवातीला छुप्या पद्धतीने सुरू असलेले अधिकाऱ्यांचे उद्योग अलीकडे उघडपणे सुरू झाले होते. सत्ताधारी नेत्यांचा आशीर्वाद व आपले कोणी वाकडे करू शकत नसल्याची भावना हे त्यामागचे कारण होते. मात्र, अति झाल्याने ते चौकशीच्या जाळय़ात आले असून यानिमित्ताने अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चपराक मिळेल, असे मानले जाते.