अशी पडली दादांच्या गळय़ात स्वागताध्यक्षपदाची माळ Print

प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

थोरल्या साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामतीच्या मोरोपंतनगरी येथे होणाऱ्या आगामी नाटय़संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची माळ अखेर ‘दादां’च्या गळय़ात पडली. ‘दादा’ की ‘ताई’ हा प्रश्न समयसूचकतेने सोडवून नाटय़ परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना संमेलनाच्या काळात दादांना तीन दिवस बारामतीमध्ये गुंतवून ठेवण्यामध्ये यश आले आहे.
१२-१२-१२ ही शतकातून एकदाच येणारी अनोखी तारीख, केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस असा दुहेरी योग साधून बारामती येथे आगामी नाटय़संमेलन होणार आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम होणार असल्याने या नेत्याला बारामतीमध्ये संमेलनास उपस्थित राहणे शक्य होणार नाही हे ध्यानात घेऊन आता हे संमेलन २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. नाटय़संमेलनाच्या अधिकृत तारखा जाहीर झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात ११ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजून १२ मिनिटांपासून संमेलनाचे कार्यक्रम सुरू होणार आहेत.
बारामती येथे संमेलन जाहीर झाले त्या वेळी उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांची निवड स्वागताध्यक्षपदी करावी अशी नाटय़ परिषदेच्या बारामती शाखेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. मात्र, याच कालावधीमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत असून, नागपूर येथे राष्ट्रपतींचा कार्यक्रमदेखील होण्याची शक्यता आहे. ‘राजशिष्टाचारानुसार उपमुख्यमंत्री या नात्याने तेथे उपस्थित राहावे लागणार असल्यामुळे मला नाटय़संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदामध्ये गुंतवून ठेवू नका,’ असे सांगत अजित पवार यांनी हे पद स्वीकारता येणार नसल्याचे स्पष्ट तर केलेच, पण त्याचबरोबरीने खासदार सुप्रिया सुळे यांना स्वागताध्यक्ष करावे, अशी सूचनादेखील केली. नाटय़संमेलनासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे आश्वासनदेखील त्यांनी या पदाधिकाऱ्यांना दिले.
दरम्यानच्या काळात जलसंपदा विभागातील गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ आणि ऊर्जा खात्याचाही राजीनामा दिला. त्यामुळे ‘पवार विरुद्ध पवार’ संघर्षांची चर्चा सुरू झाली. याच कालावधीत नाटय़ परिषदेच्या स्वागताध्यक्षपदाच्या निवडीचा कसोटी पाहणारा निर्णय नाटय़ परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना घेणे भाग होते. अजितदादांच्या सूचनेनुसार खासदार सुप्रिया सुळे यांची स्वागताध्यक्षपदी निवड करावी तर पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ संघर्षांचीच चर्चा सुरू राहणार हे ध्यानात घेऊन या राजीनाम्यावरची धूळ बसल्यानंतर नाटय़ परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधला आणि स्वागताध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळय़ात घातली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या किमान तीन दिवसांच्या
अनुपस्थितीत नागपूरचे अधिवेशन होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.