विमानतळाभोवती बांधकाम करता येईल अशा उपसूचना Print

वादग्रस्त विकास आराखडा
 पुणे/प्रतिनिधी
विमानतळ परिसरातील क्षेत्रामध्ये निवासी बांधकाम करताना पुणे विमानतळ अधिकाऱ्यांमार्फत संरक्षण खात्याची परवानगी आवश्यक असताना विकास नियंत्रण निमयावलीतील ही महत्त्वाची तरतूद रद्द करण्याची उपसूचना विकास आराखडय़ात देण्यात आली आहे. त्यावर देशाच्या संरक्षणाशीच खेळण्याचा हा प्रकार असल्याची हरकत घेण्यात आली असून या प्रकाराकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
काँग्रेसचे प्रदेश सचिव, नगरसेवक संजय बालगुडे आणि नगरसेवक मुकारी अलगुडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्य सभेला सादर करण्यात आलेल्या आराखडय़ाला ज्या अनेक उपसूचना देण्यात आल्या आहेत त्यात या धक्कादायक उपसूचनेचा समावेश असल्याचे बालगुडे म्हणाले. महापालिकेच्या जुन्या विकास नियंत्रण नियमावलीत विमानतळ, ग्लायडिंग सेंटरच्या परिसरात इमारतींच्या उंचीवर बंधने घालण्यात आली आहेत. तसेच विमानतळ व स्फोटके चाचणी क्षेत्राच्या १०० मीटर परिसरात कुठलेही बांधकाम करू नये आणि भारतीय वायुसेनेच्या ९०० मीटर परिसराच्या पुढे बांधकाम करण्यात यावे, अशी नियमावलीतील तरतूद आहे.
ज्या इमारतींची उंची १५ मीटरपेक्षा अधिक आहे वा आंतराष्ट्रीय विमानतळाच्या दोन किलोमीटर परिसरात ज्या इमारतींचे बांधकाम होणार आहे, तसेच जे बांधकाम संरक्षण खात्याच्या एक किलोमीटर परिसरात आहे अशा बांधकामाला परवानगी देताना पुणे विमानतळ अधिकाऱ्यांमार्फत संरक्षण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे, अशीही नियमावलीतील तरतूद आहे. मात्र, ही तरतूद रद्द करून अश्या परवानगीची आवश्यकता नाही अशी उपसूचना देण्यात आली आहे.
देशाच्या संरक्षणापेक्षाही बांधकाम व्यावसायिकांचे हित पाहण्याचाच हा प्रकार असून ही बाब आम्ही निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिली आहे. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशीही विनंती त्यांना केली आहे, असे बालगुडे यांनी सांगितले.     

जागांचे मालक शोधून काढणार
विकास आराखडय़ाला आतापर्यंत ६० उपसूचना देण्यात आल्या असून उपसूचनांच्या माध्यमातून जी जी आरक्षणे उठवण्यात वा सरकवण्यात येत आहेत, त्या जागांचे मालक आम्ही शोधून काढणार आहोत, असे नगरसेवक संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. ज्यांच्यासाठी आरक्षणे बदलण्यात येत आहेत त्यांची नावेही आम्ही जाहीर करू, म्हणजे आराखडा नक्की कोणासाठी करण्यात आला आहे ते पुणेकरांना समजेल, असेही ते म्हणाले.