विकास आराखडय़ाबाबत काँग्रेसमध्ये चर्चाच नाही Print

पुणे/प्रतिनिधी, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
पुणे शहरासाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा सादर होऊन तो मंजूर करण्याच्या हालचाली राष्ट्रवादीकडून, तर आराखडय़ाला सर्वतोपरी विरोध करण्याचे प्रयत्न भाजप, शिवसेना व मनसेकडून सुरू असले, तरी आराखडय़ाबाबत काँग्रेसची भूमिका मात्र अद्याप ठरलेली नाही. त्यामुळे आराखडय़ाबाबत पक्षात गोंधळाचे वातावरण आहे.
पुण्याचा विकास आराखडा महापालिकेच्या मुख्य सभेत दोन दिवसांपूर्वी सादर झाला. या आराखडय़ाच्या विरोधात भाजपने उघड भूमिका घेतली असून आराखडय़ाच्या चौकशीचीही मागणी भाजपने केली आहे. तसेच आराखडय़ातील आरक्षणे कशा पद्धतीने बदलण्यात आली, ती अलीकडे, पलीकडे कोणासाठी सरकवण्यात आली याचा अहवाल भाजप, शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पुढील आठवडय़ात मांडला जाईल, असेही आमदार गिरीश बापट यांनी जाहीर केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून आराखडय़ाला जेवढय़ा उपसूचना देण्यात आल्या आहेत, त्या सर्व उपसूचनांना आमचा विरोध राहील, असेही भाजपने जाहीर केले आहे.
विरोधी पक्षांनी आराखडय़ाच्या विरोधातील भूमिका घेतली आहे तसेच राष्ट्रवादीने आराखडा मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरात लवकर म्हणजे पुढील महिन्यात बोलावलेल्या सभेतच आराखडा मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने आराखडय़ाबाबत कोणतीही भूमिका अद्याप घेतलेली नाही. काँग्रेसचे नगरसेवक त्यामुळे गोंधळात असल्याचे चित्र आहे.
पक्षाचे नगरसेवक संजय बालगुडे आणि मुकारी अलगुडे यांनी सांगितले, की आराखडय़ासंबंधी विचार करण्यासाठी वा नगरसेवकांचे म्हणणे ऐकण्यासाठी पक्षाने अद्याप बैठकच बोलावलेली नाही. या विषयावर पक्षाची एकही बैठक झालेली नाही. सादर झालेल्या आराखडय़ाबाबत कोणत्या नगरसेवकाचे काय म्हणणे आहे, कोणाचा कोणत्या उपसूचनांना वा प्रस्तावांना विरोध आहे, तो का आहे, पक्षाची त्यावर काय भूमिका आहे, यासंबंधी पक्षात विस्तृत चर्चा होणे आवश्यक होते. मात्र, अशी चर्चा करण्याची संधी नगरसेवकांना अद्याप मिळालेली नाही.