संक्षिप्त Print

‘देणं समाजाचं’ कृतज्ञता सोहळा
चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पुणे शाखेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ‘देणं समाजाचं’ या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रेडलाइट परिसरातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या स्वाधार संस्थेच्या ‘मोहोर’ प्रकल्पाला १ लाख १ हजार रुपयांची तसेच अंध मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या हँडीकॅप वेल्फेअर असोसिएशनच्या अंध मुलांच्या वसतिगृहाला ५१ हजारांची देणगी देण्यात आली. या देणगीचे धनादेश चंदुकाका सराफ अँड सन्स चे किशोर शहा व अतुल शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
‘इन्स्पायरईडी परिषद’ संपन्न
डीएसके सुपइन्फोकॉम इंटरनॅशनल कॅम्पसतर्फे आयोजित ‘इन्स्पायरईडी परिषद’ या परिषदेत ‘शिक्षण व शिक्षणसेवांसमोरील विविध आव्हाने’ या विषयावर चर्चा झाली. कॉर्पोरेट व शिक्षणतज्ज्ञांची व्याख्यानेही त्यात आयोजन करण्यात आली होती. अरविंद गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना कचऱ्यामधून खेळणे कसे तयार करावे, याविषयीची माहिती दिली. त्याचबरोबर ‘आर यू प्रीपेअर्ड टू फेल’, ‘आर यू विलिंग टू बूटस्ट्रॅप’ व ‘व्हाय पेन अॅमआय रिडय़ूसिंग’ या विषयांवर चर्चा करण्यात आली. अनु आगा, मेहेर पदमजी ‘टीच फॉर अमेरिका अँड टीच फॉर ऑल ऑर्गनायझेशन’ चे संस्थापक आदित्य नटराज यांनीही या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
चित्रपटांत ‘आदिवासी’ विषय फोडणीसारखा
‘व्यावसायिक चित्रपटांत आदिवासी हा विषय फोडणीसारखा वापरला जातो. आदिवासींच्या समस्या समजून घेऊन त्यांची सखोल चर्चा करण्याचा प्रयत्न चित्रपटांतून होत नाही,’ असे मत ‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोडय़ुसर्स असोसिएशन’चे (इम्पा) संचालक विकास पाटील यांनी व्यक्त केले. ‘बहुरंग’ या संस्थेच्या वतीने शनिवारी सातवा आदिवासी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, बहुरंगचे अध्यक्ष कुंडलिक केदारी या वेळी उपस्थित होते. या महोत्सवात केदारी यांनी दिग्दर्शित केलेला ‘आत्मबोध - द सेल्फ रिअलायझेशन’ हा नक्षलग्रस्त भागांतील आदिवासींच्या समस्या मांडणारा चित्रपट दाखविला गेला. नक्षलवाद या विषयावरील हिंदी भाषेतील हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट असल्याचा केदारी यांचा दावा आहे.
‘भूजल व्यवस्थापनासाठी एकत्रित काम करावे’
भूजल व्यवस्थापनासाठी कृषी, जलसंधारण, भूजल आणि जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी एकत्रितरीत्या नियोजनपूर्वक काम करावे, अशी सूचना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी दिली. राज्यातील उपसंचालक, वरिष्ठ खोदन अभियंता आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्यासमवेत भूजल भवन येथे आयोजित राज्यस्तरीय बैठकीत ढोबळे बोलत होते. या वेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे संचालक डॉ. प्रवीण गेडाम, अतिरिक्त संचालक सुरेश खंडाळे, सहसंचालक डॉ.चेतन गजभिये व एस.व्ही.देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते. ढोबळे म्हणाले, की भूजल व्यवस्थापन ही आवश्यक बाब असून याबाबतची माहिती अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी भूजल विभागाने स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. भूजलाची पातळी उंचविण्यासाठीच्या उपाययोजना, नियोजनबद्ध वापर याबद्दलची माहिती दिनदर्शिका, घडीपत्रिका या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवावी.
भोसरीत ‘कार मेळावा’
कल्याण जनता सहकारी बँकेच्या भोसरी येथे सुरू होणाऱ्या नवीन शाखेचे औचित्य साधून २ ते ४ नोव्हेंबर या तीन दिवसांसाठी भोसरीत कार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक व्याजदर, कमी प्रोसेसिंग फी तसेच वाहन घेणाऱ्या ग्राहकास एक लाख रुपयांपर्यंत अपघात विमा देण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवडकर व मुख्य अधिकारी मीना सावंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी संदीप जाधव, नीलेश देशमुख, दौलत कांबळे, धनंजय बहिरट आदी अधिकारी उपस्थित होते. या बँकेची भोसरीत नवी शाखा सुरू करण्यात येणार असून नऊ डिसेंबरला खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.