ऐन दिवाळीच्या तोंडावर दोन टन सुका मेवा पकडला Print

पिंपरी बाजारपेठेतील जकातचोरी
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी बाजारपेठेत जकात चुकवून आणण्यात येणारा सुमारे दोन टन सुका मेवा भरारी पथकाने पकडला. त्यांच्याकडून एक लाख ३५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. मुख्य जकात अधीक्षक अशोक मुंढे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. भरारी पथकाचे जकात निरीक्षक प्रमोद पाटील पिंपरी बाजारपेठेत गस्त घालत असताना अशोक सिनेमा येथे आलेल्या एका मोटारीची संशयावरून तपासणी केली असता त्यात सुका मेवा आढळून आला. त्या मालाची जकात भरलेली नसल्याने पथकाने ती मोटार पालिका मुख्यालयात आणली त्या वेळी चालक पळून गेला. चालक नाही व मालाची बिलेही नसल्याने साहित्याचे वजन करता आले नव्हते. तथापि, नंतर तो हजर झाला. तेव्हा केलेल्या वजनात दोन टन सुका मेवा असल्याचे आढळून आले.  या पथकात बाबा कुदळे, प्रमोद पाटील, चंद्रकांत कावरे, अभिजित मोरे, प्रकाश लांडे आदींचा समावेश आहे.