सीबीआयचा पोलीस असल्याचे सांगून लुटणाऱ्या तोतयाला अटक Print

प्रतिनिधी
धनकवडी येथील एका व्यक्तीच्या घरी जाऊन सीबीआयचा पोलीस असल्याचे सांगून लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी या तोतया पोलिसाला चोरलेल्या फोनवरून माग काढत गजाआड केले. त्याने याप्रकरे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. न्यायालयाने अधिक तपासासाठी एक नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अभय विनायक बनसोडे (वय ३९, रा. बोराडी मळा, ता. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुनिल चंद्रकांत देशमुख (वय ३१, रा. आनंदनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनसोडे हा २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास देशमुख यांच्या घरी गेला. त्याने देशमुख यांना आपण सीबीआय क्राईम ब्युरो मुंबई येथून आलो आहे. तुम्हाला एका गुन्ह्य़ात अटक करावी लागेल. ती टाळायची असेल तर त्यासाठी तीस हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देशमुख यांना दिली. त्यांनी पैसे न दिल्यामुळे बनसोडे याने त्याच्याजवळील आठ हजार रुपये कि मतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. याबाबत देशमुख यांनी सहकारनगर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार या गुन्हाचा तपास सुरू होता. चोरीच्या मोबाईलवरून बनसोडेचा शोध घेऊन त्याला अटक केली. बनसोडे याचे बीएपर्यंत शिक्षण झाले असून तो बेकार आहे. त्याने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केलेत का, याचा पोलीस तपास करत आहे. याप्रकरणी अधिक तपास फौजदार भोसले करीत आहेत.