पियानोचे स्वर अन् कचरावेचकांची वेदना..! Print

प्रतिनिधी
एका आंतरराष्ट्रीय पियानोवादकाच्या पियानोतून झरणारे स्वर.. ड्रमवर थाप पडल्यावर घुमणारा तालबद्ध नाद.. आणि जोडीला कचरावेचक स्त्रियांच्या गाण्यांमधून उमटणारी वेदना..!
किंबल गॅलॅगर हे मूळचे बोस्टनचे पियानोवोदक. सध्या ते कार्यक्रमांसाठी भारतात आले आहेत. समाजासाठी काम करणाऱ्यांना आपल्या वादनातून प्रेरणा देण्याच्या विचारातून किंबल यांनी भारतातल्या कचरावेचकांसाठी कार्यक्रम करायचे ठरविले आहे. येत्या ४ नोव्हेंबरला किंबल पुण्यात येणार असून ते ‘स्वच्छ’ या संस्थेसाठी पियानोवादन सादर करणार आहेत. ‘ताल आयएनसी’ हा ड्रमर्सचा ग्रुप आणि ‘स्वच्छ’ च्या कचरावेचक स्त्रियाही किंबल यांच्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ४ नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता ‘सरदार दस्तूर गर्ल्स हायस्कूल’ च्या मझदा सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
अग्नेय चिकटे ‘ताल’ ग्रुपचे प्रतिनिधित्व करणार आहेत, तर सुधाबाई कांबळे, शोभा बनसोडे, सरुबाई वाघमारे आणि कांता शिंदे या कचरावेचक स्त्रिया ‘स्वच्छ’ मध्ये लिहिलेली गाणी म्हणण्यासाठी कसून सराव करीत आहेत. यातल्या काहीजणी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात गाणार आहेत. त्यामुळे त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विशेष म्हणजे किंबल यांनी संस्थेच्या अभिजित खंडागळे या सदस्यासाठी एक खास रचना बनविली आहे. अभिजित हा एका कचरावेचक महिलेचा मुलगा. त्यांच्या कुटुंबात अभिजित एकटाच शिकलेला. आपल्या शिक्षणाचा उपयोग कचरावेचकांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी करणाऱ्यांपैकी अभिजित हा एक. त्याच्या आणि त्याच्यासारख्या इतरांच्या संघर्षांला किंबल आपली नवीन रचना समर्पित करणार आहेत.