ठरला आत्महत्यांचा दिवस.. Print

पुण्यात रविवारी व सोमवारी मिळून आठजणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यात सातजणांचा मृत्यू झाला. वडगाव-बुद्रुक येथे दांपत्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पिंपरीत संगणक अभियंत्याने गळफास घेतला. फर्गसन महाविद्यालयाजवळील टेकडीवरही एका तरुणाने झाडाला दोरी बांधून फास लावून घेतला, तर महर्षिनगर येथे इमारतीत शिरलेल्या चोरटय़ाने, रहिवासी व पोलीस पाठलाग करत असताना अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. निगडी येथे महिलेने आजाराला कंटाळून मृत्यूला कवटाळले. मोशी व भोसरी येथेही आत्महत्या झाल्या.. अशा प्रकारे सोमवार आत्महत्यांचा दिवस ठरला.
प्रतिनिधी
चोरटय़ाची ११ व्या मजल्यावरुन  उडी मारून आत्महत्या
पुणे - बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत चोरी करणाऱ्या चोरटय़ाचा नागरिक व पोलिसांनी पाठलाग केला, तेव्हा तो अकराव्या मजल्यावर पोहोचला आणि तिथून उडी मारून त्याने आत्महत्या केली. महर्षिनगर येथील झांबरे पॅलेसजवळ सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. या चोरटय़ाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याचे वय साधारण २५ ते २८ दरम्यान आहे.
मुकुंदनगर येथील झांबरे पॅलेसजवळ संतोष सुरेश खाटपे (वय २८) यांची दुमजली इमारत आहे. खाटपे हे दुसऱ्या मजल्यावर राहण्यास असून खालच्या मजल्यावर प्रिंटिंग प्रेस आहे. या ठिकाणी सोमवारी सकाळी आठच्या सुमारास एक व्यक्ती प्रिंटिंग प्रेसमध्ये शिरत असल्याचे त्यांना दिसले. ते तत्काळ खाली पळत आले असता त्या चोरटय़ाने तेथून पळ काढला. खाटपे यांनी त्याचा पाठलाग केला. त्यांना इतर नागरिकांनी मदत केली. याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. गस्तीवर असलेले पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले. तो चोरटा तेथे जवळच बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये शिरला. त्याचा त्या ठिकाणी नागरिकांनी शोध सुरू केला असता त्याने अकराव्या मजल्यावरून उडी मारली.
पिंपरीत संगणक अभियंत्याची आत्महत्या
पिंपरीतील मधुबन सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका संगणक अभियंत्याने घरातच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी घडला. नितीन ज्ञानदेव साबळे (वय २२, रा. मधुबन सोसायटी, म्हाडा कॉलनी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. साबळे हा आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होता. म्हाडा कॉलनीतील घरी आपल्या आई-वडील व बहिणीसोबत होता. रविवारी सकाळी बराच वेळ झाला तरी साबळे झोपेतून न उठल्यामुळे आईने दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे त्यांनी शेजारच्या नागरिकांना बोलाविले. त्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता साबळे यांने खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
फग्र्युसन टेकडीवर तरुणाची आत्महत्या
फग्र्युसन महाविद्यालयाच्या टेकडीवर अंगातील टी-शर्टच्या साहाय्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. जितू ऊर्फ गणेश शंकर जाधव (वय २२, रा. गोलंदाज चौक, पांडवनगर पोलीस चौकीजवळ) असे त्या तरुणाचे नाव आहे.
वडगाव बुद्रुक येथे पती-पत्नीने विष घेतले
वडगाव बुद्रुक येथे पती-पत्नीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. शेजारच्या नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र, पत्नीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून पतीची प्रकृती गंभीर आहे.
आशा बाबासाहेब अरिंडे (वय ४५) व बाबासाहेब अरिंडे (रा दोघेही. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) अशी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत आशा यांचा मृत्यू झाला आहे. हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक येथील घरात दोघे पती-पत्नीच राहत होते. सोमवारी सायंकाळी दोघेही घरात बेशुद्ध अवस्थेत शेजारच्या नागरिकांना आढळून आले. त्यांनी तत्काळ सिंहगड रस्त्यावरील जगताप हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. मात्र, आशा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बाबासाहेब यांची प्रकृती गंभीर असून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अरिंडे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांना दोन मुले असून एक चौदा वर्षांचा मुलगा शाळेत गेला होता. तर दुसरा मुलगा बाहेर गेला होता. घटेनच्या वेळी दोघेच घरी होते. त्याच्या आत्महत्येमागील कारणही स्पष्ट झालेले नाही.
निगडी, भोसरी, मोशी येथे तिघांची आत्महत्या
पिंपरी-चिंचवड परिसरात भोसरी, निगडी आणि मोशी येथे दिवसभरात तीन आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. श्वेता उमाकांत पर्वतकर (वय ४७, रा. संभाजीनगर उद्यानाजवळ, निगडी), अर्जुन अजित सरोदे (वय ३१, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) आणि सरिता अमोल बारबाल (वय ३२, रा. मोशी) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. यातील पर्वतकर यांना मधुमेहाचा आजार असल्याने आजाराला कंटाळून ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्याता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सरोदे यांना दारूचे व्यसन असून दुपारी तीनच्या सुमारास त्यांची पत्नी घरी आली असता घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तर सायंकाळी सातच्या सुमारास बारबाल यांनी घरातील पंख्याला आत्महत्या केल्याचे दिसून आले.