‘तोरण मिरवणुकांवरील बंदी पुणेकरांच्या पाठिंब्यामुळेच शक्य’ Print

पोलीस आयुक्त पोळ यांची माहिती
प्रतिनिधी
पुणेकरांच्या पाठिंब्यामुळेच कायदा राबविणे शक्य होत असून, आताच्या नवरात्रीत तोरण मिरवणुकांवरील बंदी अमलात आली हे त्याचेच एक उदाहरण आहे. पुढच्या काळातही कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केले.
पुण्यातील वाहतूक व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान अशा विविध विषयांवर पोळ यांनी ‘लोकसत्ता’ शी बातचीत केली. आताच्या नवरात्रीत पुणे पोलिसांनी तोरण मिरवणुकींवर बंदी घातली होती. त्याची अंमलबजावणी करण्यात आली. मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मंडळाच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ‘हे पुणेकरांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले. पुढच्या काळातही पुण्यातील वाहतूक सुधारण्यासाठी व पुणे अधिक सुरक्षित करण्यासाठी नागरिकांच्या अशाच सहकार्याची आवश्यकता आहे,’ असे ते म्हणाले.
‘पोलिसांनी गणपती विसर्जनमिरवणुकीच्या वेळेस तीन हजारांपेक्षा अधिक महाविद्यालयीन तरुण-तरुणींची मदत घेतली होती. आता त्यांचा उपयोग शहरातील ज्येष्ठ नागिरकांना मदत मिळवून देण्यासाठी करण्याची योजना आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक घरात एकटेच असतात, त्यांना आधाराची गरज असते. सेवाभावी वृत्तीने काम करणारी तरुण मंडळी त्यांच्या उपयोगी पडू शकतात. हे तरुण ठराविक काळानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जातील, त्यांची विचारपूस करतील. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आधार वाटेल आणि या तरुणांच्या माध्यमातून लहान-मोठी कामेसुद्धा होतील. या तरुण-तरुणींच्या परीक्षा आणि दिवाळी संपल्यानंतर या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली जाईल,’ असे आयुक्त म्हणाले.    

‘हेल्मेटबाबत कंपन्यांशी बोलणार’
सध्या बाजारात मिळणारी बहुतांश हेल्मेट नागरिकांसाठी गैरसोयीची आहेत, त्यांच्यामुळे दोन्ही बाजूच्या गोष्टी दिसण्यास अडथळा येतो. तसेच, ऐकू कमी येते, या बाबी पुण्यातील व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे हेल्मेटमध्ये नागरिकांच्या सोयीच्या सुधारणा करण्याबाबत कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बोलणार आहोत, असेही आयुक्त पोळ यांनी सांगितले.