डास उत्पत्ती रोखण्याच्या मोहिमेसाठी पिंपरी पालिका घेणार ‘कायदेशीर सल्ला’ Print

डेंग्यूचे रुग्ण वाढले
पिंपरी/प्रतिनिधी
मागील दोन महिन्यांत शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याची भीती व्यक्त करतानाच महापालिकेने जनजागृती मोहीम राबवत नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षण, माहितीपत्रके, धुरीकरण, कीटकनियंत्रण आदी उपाययोजनाच पुन्हा करण्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. डास उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचनांचे कारखानदार, व्यावसायिक व बिल्डरांनी पालन न केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करता येईल का, असा कायदेशील सल्लाही घेण्यात येणार आहे.
महापालिकेचे सहआयुक्त अमृतराव सावंत व मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांनी डेंग्यूविषयक सद्यस्थिती, उपाययोजना व खबरदारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. जानेवारीपासून आजपर्यंत ५६ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. मागील दोन महिन्यात डेंग्यूचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य तसेच वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह आवश्यक कामे तातडीने करण्याचे आदेश सावंत यांनी दिले. घरात पाणी साठवण्याची सर्व भांडी रिकामी करून कोरडी करावी, रिकाम्या करणे शक्य नाही, अशा टाक्यांना घट्ट झाकण बसवावे, अंगणात, गच्चीवरील भंगार मालाची विल्हेवाट लावावी. हिवताप, डेंग्यू, चिकूनगुन्यासारखे रोग पसरू नयेत म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन सावंत व डॉ. जगदाळे यांनी केले.
पालिकेचे कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करणार असून माहितीपत्रके वाटणार आहेत. पाण्याचे साठे तपासून ते नष्ट करणे व आवश्यक ठिकाणी धुरीकरण करण्यात येणार आहे. डास उत्पत्ती असणारी ठिकाणे व्यावसायिक, कारखानदार तसेच बिल्डरांची असल्याचे आढळून आले आहे. अशी स्थानके नष्ट करण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. यापुढे त्यांना नोटिसाही बजावण्यात येतील. तरीही लक्ष न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याविषयी कायदेशीर सल्ला घेऊ, अशी भूमिका सावंत यांनी स्पष्ट केली.