निर्मूलनासाठी विशेष मोहीम ; डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव Print

घरात स्वच्छ पाणी साठणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
शहरात विविध भागात डेंग्यू तसेच मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे घरात आणि घराच्या परिसरात कोठेही स्वच्छ पाणी साठणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी डेंग्यू निर्मूलनासाठी विशेष मोहीम सुरू केली असून शहरात मोठय़ा प्रमाणावर औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.
डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असल्यामुळे घरात पाच दिवसांपेक्षा जास्त काळ स्वच्छ पाणी साठवून ठेवू नका, असे आवाहन महापालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. घरातील फ्रीज, एअर कुलर, कपडे धुण्याची यंत्रे, फुलदाण्या, कुंडय़ा, पत्र्याचे डबे, वातानुकूलन यंत्रणा यातही पाणी साठण्याची शक्यता असल्यामुळे ते पाणीही पाच दिवसांपेक्षा अधिक काळ साठणार नाही याची काळजी घ्यावी, असे कळविण्यात आले आहे. घराबाहेर वा घराच्या परिसरात फुटक्या बादल्या, भंगार सामान, रिकाम्या कुंडय़ा, रिकामे डबे, वापरलेले टायर यात पाणी साठले, तर त्यात डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे परिसरात कोठेही असे साहित्य पडलेले आढळल्यास त्याची विल्हेवाट लावावी, तसेच छोटय़ा-मोठय़ा खड्डय़ांमध्येही पाणी साठू शकते. अशा ठिकाणीही पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
साठलेले पाणी वाहते करणे, जमिनीवरील तसेच गच्चीतील पाण्याच्या टाक्यांची झाकणे गच्च बंद करणे, त्यात फट राहणार नाही याची काळजी घेणे, पाणी साठवण्याचे बॅरल, ड्रम, छोटी-मोठी पिंपे दर दोन दिवसांनी धुवून स्वच्छ व कोरडी करणे आवश्यक असून याबाबतही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. डासांची उत्पत्ती स्थाने तयार होऊ शकतात अशी ठिकाणे नष्ट केल्यास मलेरिया तसेच डेंग्यूचे डास उत्पन्न होणार नाहीत, असेही कळविण्यात आले आहे.
महापालिकेने शहरात विविध ठिकाणी औषध फवारणी सुरू केली असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्फे हे काम हाती घेण्यात आले आहे. विशेषत: पाणी साठण्याच्या ठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. प्रत्यक्ष कृतीबरोबरच शहरातील दुर्लक्षित पाणी साठवण ठिकाणे नष्ट करणे, पाण्याची डबकी नष्ट करणे, भंगार साहित्य नष्ट करणे अशीही कामे केली जात असून जनजागृतीचीही मोहीम हाती घेण्यात आली आहे.