संक्षिप्त Print

स. मा. गर्गे यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान
समाजविज्ञान कोशकार, इतिहासकार आणि ज्येष्ठ पत्रकार स. मा. गर्गे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (४ नोव्हेंबर) ‘महाराष्ट्र इतिहासाची लेखनमीमांसा’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान होणार आहे. मराठवाडा मित्र मंडळाच्या ज्ञानेश्वर सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम भूषविणार आहेत, असे प्राचार्य भाऊसाहेब जाधव आणि संजय गर्गे यांनी कळविले आहे.
राज्याच्या लोकायुक्तांकडून सुनावणी
राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती पुरुषोत्तम गायकवाड मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले होते. या वेळी लोकायुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पुनर्वसन विभाग, भूसंपादन अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, करमणूक कर अधिकारी कार्यालय यांच्याशी निगडित सुमारे ५६ प्रकरणांची सुनावणी केली. लोकायुक्त ३१ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे जिल्हा परिषद, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, शिक्षण संचालक कार्यालय, सहकार विभाग, समाजकल्याण आयुक्तालय यांच्याशी निगडित प्रकरणांवर तर १ नोव्हेंबर रोजी नोंदणी महानिरीक्षक, उपसंचालक आरोग्य सेवा, धर्मादाय आयुक्तालय, प्रादेशिक परिवहन अधिकारी आदी कार्यालयांशी निगडित प्रकरणांवर सुनावणी घेणार आहेत, अशी माहिती लोकायुक्त कार्यालयाचे प्रबंधक पं.बा.जाधव यांनी दिली. जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, भोरचे प्रांताधिकारी संजय आसवले आदी अधिकारी या वेळी उपस्थित होते.
३ व ४ नोव्हेंबर दरम्यान ‘आशियाना’ प्रॉपर्टी प्रदर्शन
सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे ३ व ४ नोव्होंबर दरम्यान ‘आशियाना’ या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन कृषी महाविद्यालयाचे पटांगण, सिंचन नगर, रेंज हिल्स येथे होणार असून या प्रदर्शनात बाधकांम क्षेत्रातील उद्योजक, प्रमोटर्स, डेव्हलपर्स, बिल्डर्स सहभाग घेणार आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरातील विविध भागात उभारल्या जाणाऱ्या प्रॉपर्टी संदर्भात ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे. तसेच या प्रदर्शनावेळी आरक्षित केलेल्या जमिनी व घरांवर सूट देखील दिली जाणार आहे.
प्रकाश बंग यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
ज्येष्ठ मार्केटिंग तज्ज्ञ प्रकाश बंग यांच्या ‘युवर एन्टरप्राइज इजन्टडेड.यट्.’ या व्यवसायाच्या यशाचे गमक सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. आंत्रप्रिन्युअर्स आणि व्यावसायिकांना यशस्वी होण्याचे १०१ मार्ग सुचवणारे हे एक निराळ्या शैलीतील पुस्तक बंग यांनी बाजारात उपलब्ध करुन दिले आहे. आलेल्या संधीचा फायदा कसा करून घ्यावा, एखाद्या बँड्रला ओळख कशी मिळवून द्यावी तसेच मनुष्य बळाबरोबर आर्थिक बळ कसे उभे करावे, परदेशातल्या बाजारपेठेत कसे स्थिर व्हावे आदी गोष्टींवर या पुस्तकाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. www.prakashbang.com/thebook या संकेत स्थळावरून या पुस्तकाची प्रत घेऊ शकता.
उपचारासाठी मदतीचे आवाहन
स्वाती फुंदे (वय १२) ही फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त आहे. तिच्यावर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे ४ लाख इतका खर्च येणार असून तिचे कुटुंब शस्त्रक्रियेसाठीचा येणार हा खर्च पेलण्यास असमर्थ आहेत. तरी इच्छुकांनी आपली मदत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, एरंडवणे, रुग्ण क्रमांक ४९१५०० या क्रमांकावर पाठवावी.
तेजा बांदलला  ‘ओरिगामी आंतरराष्ट्रीय’ स्पर्धेत पारितोषिक
ब्रिटिश ओरिगामी सोसायटीने आयोजित केलेल्या ‘ओरिगामी आंतरराष्ट्रीय’ स्पर्धेमध्ये भारताच्या कु. तेजा सुहास बांदल हिने प्रथम क्रमांकाचा एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड पटकावले. १२३ देशांच्या स्पर्धकांनी भाग घेतलेल्या व कॉम्प्युटर ऑनलाइन (स्काइपद्वारे) झालेल्या स्पर्धेत तेजा हिने प्रथम क्रमांक पटकावला. ओरिगामी ही चीनमध्ये उगम पावलेली व जपानमध्ये विकसित झालेली कला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे गमिंग व कटिंग न करता फक्त जॉमेट्रिकल फोल्डिंग करून कागदाच्या अनेक कलाकृती बनवल्या जातात.
‘गानसरस्वती महोत्सव २०१२’ चे आयोजन
नाटय़संपदा प्रतिष्ठानच्या वतीने १७ व १८ नोव्हेंबर रोजी  हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित दोन दिवसीय ‘गानसरस्वती महोत्सव २०१२’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव प्रथमच होत असून जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका किशोरी अमोणकर यांचा या वेळी भव्य सत्कार करण्यात येणार आहे. ए.शिवमणी यांचे ड्रम्सवादन आणि किशोरी अमोणकर यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे पहिल्या दिवसाचे वैशिष्टय़ असणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बेगम परवीन सुलताना, रघुनंदन पणशीकर, संगीत मरतड पं.जसराज यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आहे. याच दिवशी मिलिंद रायकर आणि रवींद्र चारी यांच्या व्हायोलिन आणि सतार वादनाची जुगलबंदी रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका ५ नोव्हेंबरपासून बालगंधर्व रंगमंदिर , यशवंतराव चव्हाण नाटय़गृह आणि टिळक स्मारक रंगमंदिर येथे उपलब्ध होतील.
मुन्शी प्रेमचंद यांच्या अनुवादित कथासंग्रहाचे प्रकाशन
मधुश्री प्रकाशन तर्फे मुन्शी प्रेमचंद यांच्या ‘कालजयी कथा’ या निवडक दहा कथांच्या संग्रहाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. विजया भुसारी यांनी या कथांचा अनुवाद केला आहे. या वेळी एकता मासिकाचे संपादक विद्याधर ताठे, किस्त्रीम मासिकाचे संपादक विजय लेले, महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीचे डॉ. दामोदर खडसे उपस्थित होते.