‘भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरगुती फराळाचा आनंद लुटा’ Print

पिंपरी / प्रतिनिधी
व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अभिनेत्री गिरीजा ओकने निगडीतील बचत गटांच्या जवळपास २०० महिलांसमवेत तासभर निवांत गप्पा मारल्या. बाजारातील भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरगुती दिवाळी फराळाचा आनंद लुटा, असा सल्लाही तिने या वेळी दिला.
निगडीतील स्वामिनी महिला बचत गट महासंघाने महिलांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या हेतूने अन्नपूर्णा किचनची स्थापना केली, त्याचे उद्घाटन गिरीजाच्या हस्ते झाले. तेव्हा भाषण करण्याचे टाळून तिने सर्वाशी थेट संवाद साधला. गृहिणीचे काम खूप कष्टाचे असते, असे सांगत तिने कलावंतांवर विशेषत: नायिकांवर खाण्याची कशी बंधने असतात व कितीही आवडता पदार्थ समोर असला तरी वजन वाढू नये, याची सातत्याने खबरदारी कशी घ्यावी लागते, हे तिने सांगितले. चित्रपट माध्यम कसे आहे, महिला कलाकारांना काय अडचणी असतात, घरच्या मंडळींचा पािठबा कसा आवश्यक असतो, इथपासून ते महिलांनी उत्सुकतेपोटी विचारलेल्या विविध प्रश्नांना तिने आडपडदा न ठेवता उत्तरे दिली.