वाडा संस्कृती अभियानतर्फे आराखडय़ाच्या विरोधात धरणे Print

प्रतिनिधी
शहरासाठी विकास आराखडा तयार करताना शहर सुधारणा समितीने बिल्डरधार्जिणे धोरण स्वीकारले असून या आराखडय़ात मध्यमवर्गीयांसाठी तसेच वाडय़ांमधील रहिवाशांसाठी घरांची कोणतीही योजना नसल्याच्या निषेधार्थ आमदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. वाडा संस्कृती अभियान संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले.
महापालिका प्रशासनाने जो विकास आराखडा तयार केला होता, त्यात जुन्या वाडय़ातील रहिवाशांसाठी अनेक चांगल्या योजना प्रस्तावित केल्या होत्या. मात्र, शहर सुधारणा समितीने त्यात सुचवलेले बदल हे वाडय़ांमधून राहणाऱ्या लाखो नागरिकांचे नुकसान करणारे आहेत, असे आमदार बापट यांनी यावेळी सांगितले. वाडा संस्कृती अभियान संघटनेचे अध्यक्ष दीपक रणधीर, भाजपचे महापालिकेतील गटनेता अशोक येनपुरे, नगरसेवक दिलीप काळोखे, धनंजय जाधव, मुक्ता टिळक, मनीषा घाटे, प्रतिभा ढमाले, तसेच प्रमोद कोंढरे, राजेश येनपुरे, उषा सुपेकर, सुवर्णा पोटफोडे, जुई मेढेकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.