आनंद भाटे, सुबोध भावे, गुरू ठाकूर, आदींना ‘पुलोत्सव तरुणाई’ पुरस्कार Print

प्रतिनिधी
पुलोत्सवात दिला जाणारा ‘पुलोत्सव तरुणाई’ पुरस्कार यंदा अभिनेते सुबोध भावे, स्वप्नील जोशी, गीतकार गुरू ठाकूर, नृत्यांगना शांभवी दांडेकर आणि गायक आनंद भाटे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रोख रुपये ११ हजार, मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरूप आहे. दहावा पुलोत्सव येत्या ४ ते ८ नोव्हेंबरदरम्यान न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे होणार असून पुलोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. पुलोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमात डॉ अभय बंग व राणी बंग यांना ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अभिनेते परेश रावल यांना ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते ‘पु.ल.स्मृती पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. तर ७ नोव्हेंबर रोजी पंडित जसराज यांना द.मा.मिरासदार यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी पंडित जसराज व मधुरा जसराज यांच्याशी संवाद साधणार आहे.