वीज खंडित केलेल्या थकबाकीदारांना डिसेंबपर्यंत अभय योजनेचा लाभ Print

मुदतीत थकबाकी भरल्यास व्याज व दंडाच्या रकमेत सूट
प्रतिनिधी
थकबाकी असल्याने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या सर्व प्रकारांतील ग्राहकांना आता डिसेंबपर्यंत ‘महावितरण’च्या अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. दिलेल्या मुदतीत थकबाकी भरल्यास विविध गटानुसार व विविध प्रमाणात मूळ रकमेवरील व्याज व दंडाच्या रकमेत सूट देण्यात येणार आहे.
 औद्योगिक, सार्वजनिक, पाणीपुरवठा योजना, घरगुती, दारिद्रय़रेषेखालील ग्राहक, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना व आदिवासी भागातील वीजग्राहक आदी सर्वाना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. थकबाकीतून मुक्ती झाल्यानंतर संबंधित ग्राहकांना पुन्हा नियमानुसार वीजजोडणी देण्यात येणार आहे. लघु व उच्चदाब औद्योगिक ग्राहकांनी मार्च २०१२ पर्यंतच्या मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास ५० टक्के व्याज व १०० टक्के दंड रक्कम माफ होणार आहे. त्याचप्रमाणे मूळ थकबाकीसोबत २० टक्के व्याजाची रक्कम भरल्यास उर्वरित ३० टक्के व्याज माफ होणार आहे. चालू किंवा कायमस्वरूपी वीज खंडित केलेल्या दारिद्रय़रेषेखालील, आदिवासी भागातील व राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेतील ग्राहकांना व्याज व दंड १०० टक्के माफ होणार आहे. घरगुती ग्राहकांना मूळ थकबाकीवरील ५० टक्के व्याज व १०० टक्के दंड माफ होईल. थकबाकीसह १० टक्के व्याजाची रक्कम भरल्यास उर्वरित ४० टक्के व्याज माफ होणार आहे.
शहरी व ग्रामीण सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या वीजग्राहकांच्या देयकातील मार्च २०१२ पर्यंतच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकाराची रक्कम निर्लिखित करण्यात आली आहे. मूळ थकबाकी भरण्यास हप्त्यांची सोयही करून देण्यात आली आहे. उच्च व लघुदाब कृषी थकबाकीदारांसाठी मार्च २००४ पर्यंतच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ होणार आहे.