शहराने अनुभवली पहिली थंडी! Print

तापमान  १२.७ अंशांवर
प्रतिनिधी
हंगामातील पहिलाच गारठा मंगळवारी सकाळी पुणेकरांनी अनुभवला. सकाळी पारा चांगलाच खाली आला आणि शहरात १२.७ अंशांच्या किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे ११.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. शहरात काही दिवसांपूर्वी तापमानात किंचीत घट झाली होती. मात्र, पुन्हा दोन-तीन दिवस पाऊस झाल्यामुळे तापमान वाढले होते. आता पुन्हा तापमान झपाटय़ाने खाली आले असून शहरात सरासरीपेक्षा तीन अंशांनी तापमान कमी नोंदले गेले. तापमान कमी झाल्यामुळे सायंकाळनंतर धुके जाणवू लागले आहे. राज्यातील अनेक शहरात तापमानात मोठी घट झाल्याने थंडीची चाहूल लागली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नीलम चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ढगाळ वातावरण निर्माण होऊन येत्या चोवीस तासात तापमानात किंचीत वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.