तळवडे व शिरूर येथे दोन आत्महत्येच्या घटना Print

प्रतिनिधी
शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात सोमवारी सात आत्महत्येचे प्रकार घडले असताना मंगळवारी पिंपरी, शिरूर व तळवडे येथे एकूण तीन आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या आहे.
राणी आनंदकुमार द्विवेदी (वय २४, रा. अदिनाथनगर, शिरूर, मूळगाव-उपरवाडी, जि. चंद्रपूर) आणि सोनल शांताराम भालेराव (वय २२, रा. संत तुकारामनगर, तळवडे) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी यांचे पती रांजणगाव औद्योगिक वसाहत येथील एका कंपनीत कामाला आहेत. सोमवारी त्यांच्या किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. आनंदकुमार हे रात्री बाराच्या सुमारास घरी आले असता त्यांना राणी यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
संगणक अभियंता असलेल्या सोनल हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आला. सोनलही कुटुंबासमवेत तळवडे येथे राहत होती. येरवडा येथील एका कंपनीत ती काम करत होती. गेल्या काही दिवसांपासून ती तणावात दिसत होती. त्यातूनच तिने ही आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पिंपरीतील निराधारनगर झोपडपट्टी येथे राहणाऱ्या जयश्री थोरात (वय २२, रा. निराधारनगर झोपडपट्टी, पिंपरी) यांनी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.