प्रदीर्घ कालावधीनंतर अजितदादा पिंपरी बालेकिल्ल्यात येणार Print

शक्तिप्रदर्शनाच्या तयारीची चर्चा?
पिंपरी / प्रतिनिधी
प्रदीर्घ कालावधीनंतर व उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहरात दौरा असून त्यानिमित्ताने राष्ट्रवादी नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. येत्या शनिवारी (३ नोव्हेंबर) विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी अजितदादा शहरात येत आहेत. सांगवीतील शिवसृष्टी व मासूळकर कॉलनीतील सांस्कृतिक भवनचे उद्घाटन तसेच महापालिकेचे अन्य कार्यक्रमही आहेत. याशिवाय, पक्षाच्या वतीने स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. बऱ्याच दिवसांनी ते शहरात येत असल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. बालेकिल्ल्यातील ताकद दाखवण्याचा प्रयत्नही या दौऱ्यातून होणार आहे. उपमुख्यमंत्री झाल्यापासून अजितदादांचा पिंपरी-चिंचवड शहराशी संपर्क कमी झाला आहे. शहरातील संबंधित प्रश्नांच्या बैठका मुंबईत अथवा पुण्यात होतात. प्रमुख नेते आपापल्या सोयीने बाहेरच त्यांना भेटतात व आपली कामे करून घेतात. तर, अधिकाऱ्यांना अजितदादा स्वत:च बोलावून घेतात. त्यामुळे नगरसेवक व कार्यकर्त्यांना भेटण्याचे निमित्त मिळत नाही. या दौऱ्याच्या निमित्ताने अजितदादा त्या सर्वाशी संवाद साधतील, असे सांगण्यात आले.