पथारी पंचायतीचे सदस्य आता गणवेशात दिसणार Print

प्रतिनिधी
पथारी व्यावसायिक पंचायतीच्या सर्व सदस्यांनी व्यवसाय करतानाचा वेश निश्चित केला असून यापुढे टप्प्याटप्प्याने सर्व पथारी व्यावसायिक संघटनेने ठरवून दिलेला वेश घालूनच व्यवसाय करणार आहेत.
‘पथारी व्यावसायिक पंचायत’ च्या सर्व सदस्यांनी संघटनेने निश्चित केलेला वेश परिधान करूनच रस्त्यावर व्यवसायासाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. उपक्रमाच्या प्रारंभी सदस्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, सरचिटणीस बाळासाहेब मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जी. देशमुख, विजय चौकर, रवींद्र हुले, इकबाल आळंद, ताराबाई नलावडे आदींची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमामुळे पथारी व्यावसायिकांची शहरवासियांसमोर नवी ओळख निर्माण होणार आहे, असे यावेळी डॉ. आढाव म्हणाले.
आम्ही नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका होणार नाही तसेच वाहतुकीला अडथळा होणार नाही अशाच पद्धतीने व्यवसाय करू, असे सांगून डॉ. आढाव म्हणाले की, पथारी व्यावसायिकांसाठी आम्ही गणवेश निश्चित केला असला, तरी महापालिकेच्या ओळखपत्रासाठीचा आमचा आग्रह कायम आहे. महापालिकेकडून ओळखपत्र मिळत नसल्यामुळे आता संघटनाच व्यावयायिकांना ओळखपत्र वाटेल. वर्षांनुवर्षे मागणी करूनही ओळखपत्र मिळत नाही तसेच पुनर्वसनाचीही ठोस योजना आजवर राबवली गेलेली नाही.
पथारी व्यवसाय हा आमचा रोजगाराचा हक्क आहे आणि पुनर्वसनाचीही आमची तयारी आहे. कोणत्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा होईल अशाप्रकारे आम्ही व्यवसाय करणार नाही, असेही डॉ. आढाव म्हणाले. ठरवलेला हा वेष टप्प्याटप्पायने सर्व सदस्यांना वाटला जाणार असून लवकरच संघटनेचे सर्व सदस्य या वेशात व्यवसाय करताना शहरात दिसतील.