जर्मन बेकरीत बॅग ठेवणारा यासीन भटकळच असल्याचे भावाने चित्रीकरणात ओळखले Print

मुंबई एटीएसच्या पोलीस निरीक्षकाची साक्ष
प्रतिनिधी
कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीतील चित्रीकरणात बॅग ठेवणारी व्यक्ती ही यासीन भटकळ असल्याचे त्याचा लहान भाऊ अब्दुल समद याने ओळखले आहे, अशी साक्ष मुंबई दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांनी मंगळवारी दिली.
जर्मन बेकरी खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.पी. धोटे यांच्या समोर सुरू आहे. मंगळवारी मुंबई एटीएसचे पोलीस निरीक्षक कदम व पुणे एटीएसचे पोलीस निरीक्षक प्रसाद सबनीस यांची साक्ष नोंदवण्यात आली. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात कदम यांची मदत घेण्यात आली होती.
कदम यांनी सांगितले, की २४ मे २०१० रोजी अब्दुल समद याला मंगलोर येथून अटक करण्यात आली होती. त्याला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचे सीसीटीव्हीचे चित्रीकरण दाखविण्यात आले. त्या वेळी त्याने चित्रीकरणात बॅग ठेवणारी व्यक्ती ही यासीन भटकळ असल्याचे सांगितले. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेला आरोपी मोहंमद कतिल सिद्दीकी याच्याकडे चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार दिल्लीला जाऊन सिद्दीकीकडे चौकशी केली होती. त्या वेळी सिद्दीकीने १३ फेब्रुवारी २०१० रोजी यासीन भटकळच्या सांगण्यावरून दगडूशेठ गणपती मंदिर येथे बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते. सिद्दीकीने दिलेल्या माहितीवरून आपण तक्रार दाखल केली होती, असे कदम यांनी न्यायालयात सांगितले. या गुन्ह्य़ातील आरोपी मिर्झा हिमायत बेग याचे वकील अ‍ॅड. ए. रेहमान यांनी त्यांची उलटतपासणी घेतली. या खटल्याची पुढील सुनावणी तीन नोंव्हेंबर रोजी होणार आहे.