खासगी रुग्णालयांना बंधनकारक केलेला आपत्ती नियंत्रण आराखडा कागदावरच! Print

रुग्णालये उदासीन; सक्ती करण्याचा पालिकेचा पवित्रा?
बाळासाहेब जवळकर
कोलकाता येथील एका रुग्णालयाला भीषण आग लागून झालेल्या जळीतकांडाच्या पाश्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून िपपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढाकाराने खासगी रुग्णालयांसाठी आपत्ती नियंत्रण आराखडा तयार करण्याचे आश्वासक पाऊल उचलण्यात आले. त्यासाठी बैठक बोलावून महत्त्वांच्या मुद्दय़ांवर सखोल चर्चा झाली व आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचा निर्णयही झाला. प्रत्यक्षात, बहुतांश खासगी रुग्णालयांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हा आराखडा कागदावरच राहिल्याचे चित्र पुढे आले आहे. खासगी रुग्णालयाला सक्तीच करावी, अशी भूमिका आता महापालिकेच्या अग्निशामक विभागाने घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड हद्दीतील ५० खाटांपेक्षा अधिक क्षमता असणाऱ्या किंवा १५ मीटर उंच इमारत असणाऱ्या खासगी रुग्णालयाच्या प्रमुख प्रतिनिधींची अग्नी व जीवित सुरक्षा या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. पालिकेच्या बडय़ा अधिकाऱ्यांसह जवळपास २४ खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शाळा, महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृहे, औद्योगिक संस्था, कंपन्या, रेल्वे स्टेशन, बसस्थानके अशा महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी काम करणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचा निर्णय यावेळी झाला. त्याचवेळी रुग्णांच्या सुरक्षिततेविषयी विविध मुद्दय़ांवरही चर्चा झाली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने पालिका व यशदामार्फत प्रशिक्षण देण्यात यावे, रुग्णालयातील तळघरात उपाहारगृह चालवू देऊ नये, त्या ठिकाणी रसायने व इतर ज्वलनशील पदार्थ ठेवू नये, विद्युत यंत्रणेची वेळोवेळी तपासणी करावी, अग्निशमन साधनांची देखभाल व दुरुस्ती करावी, रुग्णालयांनी वर्षांतून दोनदा आपत्ती व्यवस्थापनविषयक मॉकड्रील घ्यावे, असे रुग्णालय प्रतिनिधींना सांगण्यात आले. वर्दळीच्या सार्वजनिक इमारतींमध्ये अशाप्रकारचे आपत्तीविषयक प्रशिक्षण देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. प्रत्यक्षात मात्र यापैकी बहुतांश बाबी ‘बोलाचीच कढी’ ठरल्या आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा उत्साह आरंभशूरपणा ठरला, तर खासगी रुग्णालयांनी या आराखडय़ाला फारशी किंमत दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशा परिस्थितीत, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी अनेक रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा व बांधकामात मोठय़ा प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांना लेखी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन व सातत्याने पाठपुरावा करूनही खासगी रुग्णालयांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अशा रुग्णालयांच्या व्यवस्थापनास सक्ती करण्यात यावी तसेच त्यांना अग्नी सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशामक विभागाचा ‘ना हरकत’ दाखला घेण्यास सांगावे, अशी भूमिका गावडे यांनी मांडली आहे. या संदर्भात, जगदाळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आवश्यक ते प्रशिक्षण दोन वेळा घेण्यात आले आहे. खासगी २१ रुग्णालयांना हे प्रशिक्षण देण्यात येणार होते. त्यांना या विषयी नोटिसा बजावण्यात आल्या, त्यातील १० रुग्णालयांनी अग्निशामक यंत्रणा बसवली असून उर्वरित ठिकाणी कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.