संक्षिप्त Print

कसबा माता पुरस्कार नारळीकर यांना प्रदान
अखिल कसबा पेठ श्री त्रिमूर्ती नवरात्र उत्सव समितीतर्फे देण्यात येणारा ‘कसबा माता पुरस्कार’ ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला. व्यवसायासोबतच गरजूंना मदत करणारे मोहनशेठ ओझा यांनाही हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी मंगला नारळीकर, समितीचे अध्यक्ष आतिश कोळी, कार्याध्यक्ष धनंजय दळवी, उपाध्यक्ष नीलेश घोडके आदी उपस्थित होते.
‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’च्या
‘अक्षरमौन’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’च्या वतीने पत्रकार संतोष देशपांडे लिखित ‘अक्षरमौन’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. ‘वाचकांच्या मनामध्ये अनुभूतीचे नवे दालन उघडून देणे, हे कवीचे सामथ्र्य असते आणि त्या कवितेतून अर्थाची उलगड करणे हे वाचकामध्ये दडलेल्या कवीचे कार्य असते. विशुद्ध कवितांची उत्तम परंपरा आपल्याकडे आहे. ती पुढे घेऊन जाणाऱ्या नव्या कवितासंग्रहांमध्ये ‘अक्षरमौन’चा समावेश होतो,’ असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या वेळी कॉन्टिनेन्टल प्रकाशनच्या देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर, फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विनय फडणीस, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर आदी उपस्थित होते.
‘नवे एकलव्य’-गौरव सोहळा
राम नगरकर कला अकादमीच्या वतीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा यशाची उंची गाठलेल्या वीस विद्यार्थ्यांचा ‘नवे एकलव्य’ या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्रक व पुस्तके देऊन गौरविण्यात आले. या वेळी अकादमीचे सल्लागार मोहन कुलकर्णी, बाळासाहेब पाथरकर, प्रकाश पायगुडे व सदानंद चांदेकर यांचा सत्कार करण्यात आला. नृत्यांगना शर्वरी जमेनीस, रेणू गावस्कर, लायन्स क्लबचे प्रांतपाल बी. एल. जोशी व दर्शना चंदनवानिया आदी उपस्थित होते.