‘नियोजनाचा अभाव व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच पिंपरीत डेंग्यूचा फैलाव’ Print

स्थायी समितीत आरोग्य विभाग धारेवर
पिंपरी / प्रतिनिधी
डेंग्यूने सगळीकडे थैमान घातल्यानंतर उशिरा जाग आलेल्या पालिकेतील आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी चांगलाच हल्लाबोल चढवला. नियोजनाचा अभाव व अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळेच डेंग्यूचा मोठय़ा प्रमाणात फैलाव झाल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.
स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डेंग्यूचे रुग्ण वाढल्याच्या मुद्दय़ावरून आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. जावेद शेख यांनी विषय उपस्थित केल्यानंतर अविनाश टेकावडे, चंद्रकांता सोनकांबळे, विनया तापकीर, सुषमा तनपुरे आदींनी आपापल्या भागातील डेंग्यूच्या रुग्णांची वस्तुस्थिती मांडली. मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांनी नेहमीची आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘कागदी घोडे’ नाचवण्यास सदस्यांनी आक्षेप घेतला.
बैठकीत नगरसेवकांच्या ‘टक्केवारीचे राजकारण’ असलेल्या स्वयंरोजगार ६६ संस्थांना चार प्रभागांमधील साडेपाच कोटी रुपये खर्चाचे साफसफाईविषयक काम अपेक्षेप्रमाणे मंजूर करण्यात आले. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत भाग घेणाऱ्या ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विमा उतरवण्यास मान्यता देण्यात आली. पीएमपीतील पूर्वीच्या पीसीएमटी कर्मचाऱ्यांना कर्मचारी महासंघाने केलेल्या कराराप्रमाणे दिवाळीसाठी ८.३३ बोनस व
सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्याचा विषय मंजूर करण्यात आला.       

महिलांची अजब मागणी
स्थायी समितीत दहा महिला सदस्य असून त्यातील काही सदस्यांनी मिळून तयार केलेला एक गट समांतर ‘कमिटी’ चालवत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. समिती अध्यक्ष ‘अर्थ’ कारणात विश्वासात घेत नसल्याने भलत्याच आक्रमक झालेल्या या सदस्यांच्या कारभाराला आता अधिकारी व ठेकेदारही वैतागले आहेत. पतीराजांना बैठकीत बसवण्याची अजब मागणी केलेल्या महिलांनी आता त्याही पुढे जाऊन विचित्र पध्दतीचा अवलंब सुरू केल्याचे ऐकण्यात येऊ लागले आहे.