..अन् चिनाब पुलाच्या जन्माची कथा उलगडली! Print

प्रतिनिधी
जम्मू आणि काश्मीरमधली लष्करासाठी मोक्याची असलेली जागा.. जम्मू-अखनूर-पूँछ रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी.. आणि या समस्यांचे कारण असणारा चिनाब नदीवरचा अपूर्ण राहिलेला पूल. तीन दशकांहूनही अधिक काळ अपूर्ण राहिलेला हा चिनाब पूल पूर्ण करण्यासाठी वरून प्रचंड दबाव येऊ लागला आणि संबंधित अभियंत्यांच्या हातून देशातील एक आश्चर्यच उभे राहिले. चिनाब पुलाच्या जन्माची ही कथा उलगडली ‘डी.टू.एस. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.’चे अध्यक्ष आणि या पुलाचे शिल्पकार डी. डी. शर्मा यांनी! पूल बांधणी आणि रचनात्मक अभियांत्रिकीतील विशेष योगदानाबाबत देण्यात येणारा अठरावा ‘एस. बी. जोशी स्मृती पुरस्कार’ शर्मा यांना प्रदान करण्यात आला. या वेळी शर्मा बोलत होते. डॉ. अनिल सहस्रबुद्धे, संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद मिराशी, ‘इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनिअर्स’च्या पुणे केंद्राचे अध्यक्ष अमोल बोरा, दिलीप पाटील, व्ही. एन. शिंदे, पी. व्ही. मांडके या वेळी उपस्थित होते.
चिनाब नदी उत्तर भारतातली मोठी नदी असून या नदीवरचा पूल देशातला सर्वात लांब मध्य विस्तार असलेला पूल आहे. या पुलाची एकूण लांबी २८० मीटर असून त्यात १६० मीटर लांबीचा मध्य विस्तार आहे.
शर्मा म्हणाले, ‘‘चिनाब पुलाचे बांधकाम आम्ही एक आव्हान म्हणूनच स्वीकारले. हा पूल लवकर पूर्ण व्हावा अशी स्थानिक नागरिकांची आग्रही मागणी होती. राजकीय आणि लष्करी नेतृत्वाकडूनही याबाबत प्रचंड दबाव होता. या परिस्थितीत बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनला अनेक धाडसी निर्णय झटपट घ्यावे लागले.