दिलखुलास गप्पांतून उलगडली फय्याज यांची ‘नाटय़संपदा’ Print

प्रतिनिधी
‘अश्रूंची झाली फुले’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘तो मी नव्हेच’, ‘वटवट’ या नाटकातील भूमिकांसह पुलं, सुनीताबाई देशपांडे, डॉ. वसंतराव देशपांडे, प्रभाकर पणशीकर, बेगम अख्तर, दादा कोंडके, सी. रामचंद्र, मदनमोहन, जयदेव अशा कला क्षेत्रातील दिग्गजांच्या आठवणींचा गोफ विणत लावणी, नाटय़संगीताची झलक पेश झाली आणि सुधीर गाडगीळ यांच्याशी झालेल्या दिलखुलास गप्पांतून फय्याज यांची ‘नाटय़संपदा’ मंगळवारी उलगडली.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनतर्फे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते संगीत रंगभूमीवरील गायिका-अभिनेत्री फय्याज यांना माणूस पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाहू मोडक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रतिभा शाहू मोडक, प्रमोद आडकर आणि मनीष खाडिलकर यावेळी उपस्थित होते.
आचार्य अत्रे आणि पणशीकर यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना फय्याज म्हणाल्या, ‘अश्रूंची झाली फुले’ नाटक पाहून अत्रेंनी ‘डुकरांना झाली पिल्ले’ असा विडंबनात्मक अग्रलेख लिहिला होता. त्यानंतर माझ्या ‘कटय़ार’ च्या तालमी सुरू झाल्या तेव्हा ‘ही मुलगी असुरांकडून सुरांकडे वळत आहे’ असे चित्तरंजनबापू म्हणाले. ‘कटय़ार’ चा पहिला प्रयोग साडेसहा तास झाला. त्यावेळी ‘कटय़ार घडय़ाळात घुसली’ असा अत्रेंनी अग्रलेख लिहिला होता. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्यासमवेत मी या नाटकाचे १६ वर्षांत ५३५ प्रयोग केले. ठुमरीवर अदा कशी करायची हे त्यांच्याकडून शिकले. ‘तो मी नव्हेच’ मधील ‘चन्नाक्का’ ची भूमिका आकस्मिकपणे माझ्याकडे आली. मी सोलापूरची असल्याने माझ्या मराठीलाही कानडीचा लहेजा आहे. तो फायदा मला झाला.
यावेळी फय्याज यांनी ‘मेला म्हातारा करतोय लाडीगोडी’ या लावणीसह ‘तुम्हे याद हो के ना याद हो’ ही बेगम अख्तर यांची गजल सादर केली. ‘आलाप’ चित्रपटातील गीताचे राष्ट्रीय पुरस्कारासाठी मानांकन झाले होते. मात्र, त्यावेळी सगळी पारितोषिके मुंबईच्या कलाकारांना मिळाल्यामुळे ‘दस्तक’ चित्रपटाच्या पाश्र्वगायनासाठी आरती मुखर्जी यांना पारितोषिक देण्यात आले. अशा अनेक गोष्टी हुकल्याची खंत वाटते, अशी भावना फय्याज यांनी व्यक्त केली.