बीआरटी: दुसऱ्या टप्प्याची प्रगती Print

पावणेदोन वर्षांत पावणेदोन टक्के
 प्रतिनिधी
शहरातील तीन मार्गावर बीआरटीचे काम पावणेदोन वर्षांत फक्त पावणेदोन टक्के एवढेच झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो कोटी रुपये खर्च करूनही अद्याप प्रायोगिक तत्त्वावरच सुरू असलेल्या कात्रज ते हडपसर या बीआरटी मार्गाप्रमाणेच शहरातील अन्य मार्गावरील बीआरटी मार्गाचे कामही रडतखडतच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वारगेट ते कात्रज आणि स्वारगेट ते हडपसर या बीआरटी मार्गाला सहा वर्षे उलटूनही हा मार्ग अद्याप प्रायोगिक तत्त्वावरच सुरू आहे आणि या मार्गावरील बीआरटीची कामे अपूर्ण असताना उड्डाणपुलासाठी बीआरटीचा मार्ग आता उखडण्यातही आला आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने बीआरटीचा दुसरा टप्पा ऑगस्ट २०१० रोजी हाती घेतला. या दुसऱ्या टप्प्यातील तीन मार्गासाठी जाहिरात देऊन निविदा मागवण्यात आल्या. त्या ९७ कोटी रुपयांच्या निविदांना ४ जानेवारी २०११ रोजी स्थायी समितीने मंजुरी दिली. पुढे २५ जानेवारी रोजी तीन ठेकेदार कंपन्यांना काम सुरू करण्याचे आदेश तसेच आगाऊ रक्कम म्हणून आठ कोटी रुपयेही देण्यात आले.
आठ कोटी रुपये आगाऊ दिल्यानंतर गेल्या पावणेदोन वर्षांत या मार्गाचे किती काम झाले, याची माहिती नगरसेवक आबा बागूल यांनी पत्राने मागवली होती. या मार्गाचे जागेवर १.७८ टक्के एवढे काम आजवर झाल्याची माहिती बागूल यांना प्रशासनाने दिली आहे. बीआरटी मार्गाच्या या जागा ताब्यात आलेल्या नसतानाही निविदा काढण्यात आल्या आणि कंपन्यांना कामे देण्यात आली. तेवढय़ावरच न थांबता भाववाढ सूत्रानुसार या ठेकेदार कंपन्यांना १२ टक्के दरवाढही मंजूर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात जागा ताब्यात नसतानाही निविदा काढायच्या आणि कामे लांबली की ठेकेदारांना भाववाढ सूत्रानुसार कोटय़वधी रुपयांच्या रकमा वाढवून द्यायच्या असा हा नियोजनबद्ध प्रकार असून या नुकसानीची जबाबदारी कोणाची आहे असाही प्रश्न बागूल यांनी उपस्थित केला आहे.    बीआरटीचे जे मार्ग नियोजित आहेत, त्यांच्या जागाच ताब्यात आलेल्या नसताना त्या मार्गावर बसथांबे बांधण्याची कामे तीन कंपन्यांना का देण्यात आली आणि या कामाला आता जो विलंब लागत आहे आणि त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढत आहे याचा विचार कोणी करणार आहे का नाही, असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.