आई-वडिलांचे पालनपोषण करणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य Print

जबाबदारी झटकणाऱ्या मुलास न्यायालयाचा दणका
प्रतिनिधी
आई-वडिलांच्या म्हातारपणाची काठी समजल्या जाणाऱ्या मुलानेच साठ वर्षांच्या आईला मारहाण करून घरातून बाहेर काढले. अशा मुलाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. ‘आई-वडिलांचे पालनपोषण करणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे. कुटुंबातील मोठा मुलगा असल्यामुळे तो आपली जबाबदारी टाळू शकत नाही,’ असे स्पष्ट करत न्यायालयाने मुलाला आईच्या पालनपोषण व निवासाचा खर्च म्हणून दरमहा पाच हजार रुपये पोटगी द्यावी व यापुढे आईला त्रास देऊ नये, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.एल.वानखेडे यांनी दिला.
या प्रकरणी साठ वर्षांच्या आईने आपल्या मोठय़ा मुलाविरुद्ध २००७ मध्ये अ‍ॅड. एस. एम. आपुणे यांच्या मार्फत न्यायालयात धाव घेतली होती. अर्जदार महिलेस दोन मुलगे आहेत. त्यापैकी त्यांचा मोठय़ा मुलास २००३ मध्ये सदनिका खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये गोळा करून दिले होते. मुलाने लग्नानंतर पत्नीच्या सांगण्यावरून आई-वडिलांना त्रास देण्यास सुरुवात केली.
त्याने आईकडील सर्व दागिने काढून घेऊन तिला घराबाहेर हाकलून दिले. आईला मारहाण केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या महिलेकडे उत्पन्नाचे व उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. त्यांचे पती रिक्षा चालवतात. घरभाडे भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे मोठय़ा मुलाकडून प्रतिमहिना आठ हजार रुपये पोटगी मिळावी, तसेच मुलाने घेतलेले सर्व दागिने आणि नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये मिळावेत असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता.       
आईला कोणत्याही प्रकारची मारहाण केली नसून आई आपल्या पत्नीला शिवीगाळ करायची, असे या मुलाने न्यायालयात  सांगितले.
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुराव्यानुसार त्या महिलेवर कौटुंबिक हिंसाचार झाला आहे. आई-वडिलांचे पालनपोषण करणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे.
तक्रारदार महिलेस दुसरा कमवता मुलगा असला तरीही या कारणावरून मोठा मुलगा आपली जबाबदारी टाळू शकत नाही. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात दाखल केल्यापासून दरमहा पाच हजार रुपये पोटगी द्यावी, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.