तळवडय़ात तीनमजली इमारतीच्या आगीत ३० मोटारी खाक Print

नाटय़मयरीत्या ३८ कुटुंबे बचावली
पिंपरी / प्रतिनिधी
तळवडय़ात एका तीनमजली इमारतीला लागलेल्या आगीत जवळपास २५ ते ३० गाडय़ा जळून खाक झाल्या. रात्री दोनच्या सुमारास लागलेल्या आगीची वेळीच माहिती न मिळाल्याने अडकून पडलेल्या ३८ कुटुंबांची चित्तथरारक पद्धतीने सुटका करण्यात नागरिक व अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी आगीत फटाक्यांचे गोदाम व गॅरेजचा समावेश असल्याने आगीच्या कारणाची सुई तिकडेच वळते आहे. विशेष म्हणजे आग लागली तेव्हा तासभर वेगवेगळय़ा आवाजाचे फटाके वाजत होते.
मध्यरात्रीनंतर गाढ झोपेत असलेल्या गणेशनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी कधी न विसरता येणारा थरारक अनुभव घेतला. पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी गाडीला आग लागली व शेजारी रांगेत असलेल्या मोटारी पेटत गेल्या. अशा पद्धतीने २५हून अधिक मोटारी जळाल्या. इमारतीत मोठय़ा प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना काय घडले तेच समजत नव्हते. घाबरलेल्या अवस्थेतील नागरिक मिळेल त्या मार्गाने बाहेर पडत होते. मात्र, आग वाढल्यानंतर अनेकजण अडकून पडले, त्यात महिला व बालकांचाही समावेश होता. इमारतीच्या विचित्र रचनेमुळे मदतकार्यातही अडथळे येत होते. नागरिकांना शक्य त्या पद्धतीने नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जवानांनी शिडी लावून त्या आधारे काहींना बाहेर आणले. या प्रयत्नात अनेकांच्या हाताला भाजले. त्यापैकी चारजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आले. दलाचे मुख्य अधिकारी किरण गावडे यांनी आगीचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले. शॉर्टसर्किटचा प्रकार नसून काहीसा खोडसाळपणा असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे गावडे यांनी म्हटले आहे.    

नागरिकांना वाचवताना कसब पणाला!
स्थानिक नगरसेवक शांताराम भालेकर यांनी सांगितलेले प्रसंग भयंकर होते. इमारतीत कुटुंबे अडकली, आगीमुळे सगळीकडे धूर होता. अशाही अवस्थेत नागरिकांनी दाखवलेल्या धैर्याने अनेक रहिवासी सुखरूप बाहेर पडू शकले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शिडीच्या साहाय्याने आठजण बाहेर काढले. एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून खाली थांबलेल्या नागरिकांच्या दिशेने फेकले व तिला झेलण्यात आले. आग लागल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीवर विश्वास न बसल्याने घरातच थांबलेल्या एका वृद्धेला काढताना सर्वानाच कसब पणाला लावावे लागले. नागरिकांनी केलेल्या मदतीमुळेच पुढील अनर्थ टळला, असे भालेकर यांनी सांगितले.