सांगवीतील उद्यानात साकारली ‘शिवसृष्टी’! Print

अजितदादांच्या उपस्थितीत शनिवारी लोकार्पण
पिंपरी / प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील एक एकर जागेत उभारण्यात आलेल्या शिव-जिजाऊ उद्यानात शिवसृष्टी साकारण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे १८ महत्त्वपूर्ण प्रसंग आकर्षकरीत्या उभे करण्यात आले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (३ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता लोकार्पण सोहळा होणार आहे.
नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. मार्च २०१० पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. जवळपास पावनेदोन कोटी रुपये खर्च झालेल्या या प्रकल्पाच्या उभारणीत प्रा. नितीन बानुगडे पाटील, अनुप सातपुते, उमेश ठाकर यांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे शितोळे यांनी सांगितले.
शिवजन्म, महाराजांची हत्तीवरून निघालेली मिरवणूक, सोन्याचा नांगर, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग, संत तुकोबांच्या कीर्तनाला लावलेली उपस्थिती, महाराजांचे आरमार, आग्रा दरबारातील प्रसंग, अटक व सुटका, जिजाऊंची सुवर्णतुला आदी प्रसंगाचा शिवसृष्टीत समावेश आहे. या उद्यानाचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते सर्वासाठी खुले करण्यात येणार आहे.