बचत गटांचे लाखो रुपये पालिकेने थकवल्याची तक्रार Print

प्रतिनिधी
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत महापालिका शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या बचत गटांचे लाखो रुपये महापालिकेने गेले आठ महिने थकवले आहेत. हक्काची ही रक्कम मागणाऱ्या बचत गटातील महिलांना अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्याही तक्रारी करण्यात येत आहेत.
महापालिकेने नागरवस्ती योजनेअंतर्गत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याचे काम बचत गटांना दिले आहे. या योजनेत मुख्यत: विविध प्रकारचा चविष्ट भात विद्यार्थ्यांना रोज दिला जातो. पदार्थ तयार करण्यासाठी केंद्रीत स्वयंपाकघरांची व्यवस्था करण्यात आली असून एका स्वयंपाकघरात सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांचे भोजन तयार केले जाते, अशी माहिती नगरसेविका प्रा. मेधा कुलकर्णी आणि भाजप बचत गटप्रमुख अरुणा शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. भोजन पुरवण्याचे हे काम बचत गटांना देण्यात आले असले, तरी मार्च महिन्यापासून त्यांना या कामाची बिले देण्यात आलेली नाहीत, अशी मुख्य तक्रार आहे. या योजनेसाठीचा तांदूळ शासनातर्फे पुरवला जातो. मात्र, भाज्या, डाळी, कडधान्य, तेल, मसाले तसेच किराणा या सर्व वस्तू बचत गटांना स्वखर्चाने खरेदी कराव्या लागतात. अनेक गटांना जागाही भाडय़ाने घ्याव्या लागल्या आहेत. त्याचे भाडे तसेच सिलिंडर, वाहतूक हा खर्चही मोठा असून हा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न पडला आहे. पैसे येत्या आठ दिवसात न दिल्यास बचत गटांना आंदोलन करावे लागेल, असाही इशारा देण्यात आला आहे.