डॉ. दीपक टिळक यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन Print

प्रतिनिधी
‘केसरी’ चे संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक ६ नोव्हेंबर रोजी एकसष्टाव्या वर्षांत पदार्पण करत असून त्यानिमित्ताने गौरव समितीच्या वतीने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. दीपक टिळक गौरव समितीचे अध्यक्ष मोहन धारिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. समितीचे सरचिटणीस डॉ. उमेश केसकर आणि समिती सदस्य एस. के. कुलकर्णी हेही यावेळी उपस्थित होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या डॉ. टिळक यांच्या सत्कार सोहळ्यात मोहन धारिया अध्यक्षस्थानी असतील, तर राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. डॉ. टिळक यांच्यावरील ‘कुलदीपक’ या गौरविकेचे तसेच डॉ. टिळक यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘इंदुकिरण’ या पुस्तकाचे प्रकाशनही समारंभात होणार आहे.