महापालिकेतर्फे दिवाळीनिमित्त शहरात चार ठिकाणी बचत बाजार Print

प्रतिनिधी
महापालिकेच्या नागरवस्ती विभागाने महिला बचत गटांच्या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी भरवलेल्या ‘बचत बाजार’चे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. शहरात चार ठिकाणी असे बाजार भरविण्यात येत आहेत. बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वस्तुविक्रीचे कायमस्वरूपी आधार केंद्र उभारण्याची घोषणा या कार्यक्रमात आयुक्त महेश पाठक यांनी केली.
नागरवस्ती विभागातर्फे शहरात चालवल्या जाणाऱ्या बचत गटांतर्फे विविध उत्पादने केली जातात. या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या हेतूने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत बचत बाजार या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. या बाजाराचे उद्घाटन महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल सरवदे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, महापालिका आयुक्त महेश पाठक, अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे, नागरवस्ती विभागाचे हनुमंत नाझीरकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
गणेश कला क्रीडा रंगमंच, पु. ल. देशपांडे उद्यान, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह परिसर आणि खराडी येथील झेन्सार कंपनीचे मैदान या चार ठिकाणी बचत बाजार भरवण्यात येत असून त्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथील बाजाराचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. इतर तीन ठिकाणी हा उपक्रम २ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.