आताच्या प्रेक्षकाला काय हवे, याचा अभ्यास व्हावा- विष्णू सूर्या वाघ Print

प्रतिनिधी
‘‘संगीत नाटकांनी बदलत्या जगाचे संदर्भ लक्षात घेणे आणि आताच्या प्रेक्षकाला काय हवे आहे, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नाटय़रसिक घडवण्याच्या दृष्टीने आणि संगीत नाटकामध्ये प्रवाह आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे,’’ असे मत गोवा कला अकादमीचे अध्यक्ष, आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी बुधवारी व्यक्त केले.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत नाटकातील गायक, वादक, कलाकार यांच्या एकत्रित राज्यस्तरीय परिषदेमध्ये वाघ बोलत होते. यावेळी ज्येष्ठ गायक नट पंडित रामदास कामत, कीर्ती शिलेदार, बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी उपस्थित होते. या परिषदेमध्ये राज्यातील विविध भागातून कलाकार सहभागी झाले होते. संगीत नाटके करणाऱ्या हौशी नाटय़ संस्थांना सरकारने अनुदान द्यावे, संगीत नाटय़ संस्थांना मदत करण्याचे धोरण सरकारने व्यापक करावे, पदवीपर्यंतच्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये संगीत नाटकाचा समावेश करावा, असे काही ठराव या परिषदेमध्ये संमत करण्यात आले. संगीत नाटकातील कलाकारांचे शिष्टमंडळ राज्य सरकारला आपल्या मागण्या देणार असल्याचे साखवळकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वाघ म्हणाले, ‘‘नाटकाला आता विविध माध्यमांची स्पर्धा निर्माण झाली आहे. टीव्ही पुढे बसणारा प्रेक्षक नाटय़गृहाकडे कसा वळेल ते पाहणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळी नाटक हा गावाला जोडणारा दुवा होता. मात्र, काळाच्या ओघात गाव पातळीवरचे नाटक आता मरत चालले आहे. एकूणात संगीत नाटक टिकवण्यासाठी गावपातळी वरचे नाटक जगवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपलं गाव, आपलं नाटक.. अशा प्रकारच्या भावना लोकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे.’’
पं. कामत म्हणाले, ‘‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाप्रमाणे नॅशनल स्कूल ऑफ म्युझिकल ड्रामा स्थापन करण्यात यावे. त्याचप्रमाणे नवे ‘गायक नट’ तयार व्हावेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’ शिलेदार म्हणाल्या, ‘‘आजचा वेगवान काळ संगीत नाटकाला मारक आहे. गद्य नाटकांवर असलेली वेळेची मर्यादा संगीत नाटकांवरही लादण्यात आली आहे. महाराष्ट्राला ज्या संगीत नाटकाने शास्त्रीय संगीताचा कान दिला, त्या महाराष्ट्रामध्ये संगीत नाटक टिकवण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे.’’