पालकमंत्र्यांनी उलगडला ‘हेल्पर ते मंत्री’ प्रवास! Print

पिंपरी / प्रतिनिधी
पुण्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच पिंपरी शहरात आलेले सचिन अहिर यांनी विद्यार्थिदशेपासून ते मंत्रिपदाचा प्रवास उलगडून सांगितला. इंजिनिअर असूनही गळय़ातील टाय उतरवून वेल्डरचे काम करावे लागले. मात्र, इच्छाशक्तीच्या जोरावर मंत्रिपदापर्यंत प्रवास करू शकलो, असे त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर पालकमंत्री बनलेले अहिर यांचे बुधवारी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात यशस्विनी इन्स्टिटय़ूटच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते. आमदार विलास लांडे, महापौर मोहिनी लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे, नगरसेवक नारायण बहिरवाडे, संजय वाबळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळत नव्हती. एका कामगार नेत्याच्या शिफारशीवर नोकरी मिळाली. मग गळय़ातील टाय काढून कामगाराचे कपडे चढवले. इंजिनिअर असतानाही वेल्डरचे काम करावे लागले. कामाची सुरुवात हेल्पर म्हणून झाली. हळूहळू  कामगारांच्या प्रश्नांमध्ये लक्ष देऊ लागलो व कंपनीत विभागप्रमुख झालो. कामगार पुढारी म्हणून नाव झाले. राजकारणात पडलो. पुढे आमदार व मंत्रीही झालो, असे ते म्हणाले.