केळकर समिती ४ नोव्हेंबरला पुण्यात Print

सामान्य नागरिकांशीही संवाद साधणार
प्रतिनिधी
समतोल प्रादेशिक विकासाच्या कामांत येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती येत्या रविवारी (४ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर येत आहे. विशेष म्हणजे सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनाही समितीशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
अनुशेष आणि विकास खर्चाचे समान वाटप करण्याबाबत ही समिती पाहणी करणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील असमतोल दूर करण्यासाठीच्या उपाययोजना आणि याबाबत वैधानिक विकास मंडळाची भूमिका समितीद्वारे सुचविली जाणार आहे. केळकर समिती प्रथम जिल्ह्य़ातील प्रकल्पांची माहिती घेईल. त्यानंतर जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी समितीचे सदस्य संवाद साधतील. यात डॉ. बुधाजीराव मुळीक, डॉ. पोपटराव पवार, विद्याधर देशपांडे आदि तज्ज्ञांचा समावेश असेल. दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळात नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामान्य नागरिकांना केळकर समितीशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. अल्पबचत भवन येथील प्रताप सभागृहात हा कार्यक्रम होईल.