जकात, पीएमपी, कचरा या विषयांवर आज खास सभा Print

प्रतिनिधी
शहरातील सार्वजनिक वाहतूक, जकातीचे उत्पन्न आणि कचऱ्याचा प्रश्न या तीन विषयांवर सविस्तर विचार करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीची खास सभा शुक्रवारी बोलावण्यात आली आहे. स्थायी समितीच्या दर मंगळवारी होणाऱ्या बैठकीत जकातीच्या उत्पन्नाचा तसेच पीएमपी कारभाराचा आणि कचरा प्रश्नाचा आढावा घेतला जातो. मात्र, संबंधित खात्यांच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीचे अवलोकन करणे एवढेच या आढावा घेण्याच्या कामकाजाचे स्वरूप असते. हे तिन्ही विषय शहरासाठी आणि महापालिकेसाठीही महत्त्वाचे असल्यामुळे या विषयांवर सविस्तर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी स्थायी समितीच्या अनेक सदस्यांनी वेळोवेळी केली होती. त्या मागणीनुसार या तीन विषयांवर विचार-विनिमय करण्यासाठी खास सभा बोलावून त्या सभेत ही चर्चा करावी असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी ही खास सभा होत आहे. जकात हे महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे आणि जकात वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नही सुरू असले, तरी शहरात जकातचोरी देखील मोठय़ा प्रमाणावर होत आहे. त्यामुळे जकातचोरी रोखण्यासंबंधीच्या उपाययोजना तसेच जकात विभाग अधिक सक्षम करणे याबाबत खास सभेत विचार होणार असल्याचे सांगण्यात आले. पुण्याची सार्वजिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात आणखी पाचशे गाडय़ा आणण्याचा प्रस्ताव असून अन्यही प्रलंबित विषयांवर या सभेत चर्चा होईल.